26/11 चा मुंबई आतंकवादी हल्ला हा ‘हिंदु आतंकवाद’ दाखविण्याचे काँग्रेसचे षडयंत्र होते ! – कर्नल आर. एस. सिंह

0

सोलापूर,दि.28: पूर्वी प्रत्यक्ष जी सीमेवर युध्दे व्हायची, तशी युध्दे आता होत नाहीत. आता राजकीय पक्षांचा वापर करून युध्दे केली जातात, ही जास्त स्वस्त आणि परिणाम देणारी प्रणाली आहे, हे लोकांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. हे देशांतर्गत सुरु असलेले युध्द आहे ! 26/11 चा मुंबईतील आतंकवादी हल्ला हा पूर्वनियोजित होता, हे आता कुठे लोक बोलायला लागले आहेत. 26/11चा मुंबई आतंकवादी हल्ला हा ‘हिंदु आतंकवाद’ दाखविण्याचे काँग्रेसचे षडयंत्र होते. यातून बहुसंख्य हिंदूंचे धैर्य खचवून, अल्पसंख्यांकांना एकत्र करून सत्तेत टिकून राहण्याची काँग्रेसची योजना होती, असे परखड प्रतिपादन भारतीय रक्षा विशेषज्ञ, संशोधन आणि विश्लेषण शाखा अर्थात रॉचे माजी अधिकारी आणि भारतीय सेना अधिकारी कर्नल आर. एस. सिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘26/11 मुंबई आतंकवादी हल्ला : काँग्रेसचे हिंदुविरोधी षडयंत्र !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

कर्नल आर. एस. सिंह पुढे म्हणाले, ‘आपण गेल्या 1400 वर्षांपासून जिहादी विचारधारेशी लढत आहोत. जोपर्यंत पाक अस्तित्त्वात आहे, तोपर्यंत आपल्या देशावर हल्ले होतच राहणार. त्यामुळे पाकिस्तानला आणि जिहादी विचारधारेला नेस्तनाबूत करण्याची गरज आहे. काँग्रेसची सत्ता असताना 2004 ते 2008 या कालावधीत दिल्ली, वाराणसी, अयोध्या, जयपूर, भाग्यनगर (हैद्राबाद), मुंबई, पुणे, मालेगाव आदी विविध ठिकाणी पाकिस्तानातील ‘आय.एस.आय.’ ने भारतात बसलेल्या राजकीय नेत्यांच्या साहाय्याने बाँबस्फोट घडवून आणले आणि मुंबई येथील 26/11 चा आतंकवादी हल्ला हा त्याचा कळस बिंदू होता. जेणेकरून हे सांगता यावे की, मुंबई येथील 26/11 यासह मालेगाव, समझोता एक्सप्रेस हा ‘हिंदु आतंकवाद’ होता’.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर. वी.एस. मणि म्हणाले , ‘तत्कालीन राजकीय नेत्यांकडून योग्य हस्तपेक्ष झाला असता, तर 26/11 चा हल्ला रोखला जाऊ शकला असता ! मात्र तसे झाले नाही. ‘हिंदु आतंकवाद’ एक भ्रम होता, 26/11 चा हल्ला हा याचा एक भाग होता. त्यानंतर याविषयी लिहिली गेलेली पुस्तके हा ‘हिंदु आतंकवाद कसा होता, हे सिध्द करण्यासाठी होती; मात्र आता जनतेसमोर सत्य उजेडात आले आहे. तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडल्याने 26/11 चा आतंकवादी हल्ला हा ‘हिंदु आतंकवाद’ असल्याचे त्यांना सिध्द करता आले नाही.

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक अभय वर्तक म्हणाले , ‘तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले, अन्यथा हिंदु आतंकवाद सिध्द करण्याची काँग्रेसची स्क्रिप्ट तयार होती. हिंदूंनी तुकाराम ओंबळेचे बलिदान कधीही विसरू नये. काँग्रेसने कधीही अस्तित्त्वात नसलेला ‘हिंदु आतंकवाद’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारताचे पुन्हा विभाजन टाळायचे असेल, तर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे. हिंदूंनी अजूनही सतर्क राहून देशविरोधी शक्तींविरोधात संघटीत झाले पाहिजे.’


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here