रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू 

0
फोटोः PTI

नवीन दिल्ली,दि.१६: शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा गुदमरून मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, १४ आणि १५ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर कुंभमेळ्याला जाणाऱ्या यात्रेकरूंची गर्दी क्षमतेपेक्षा जास्त होती. हे प्रवासी प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांची वाट पाहत होते. या घटनेतील १२ गंभीर जखमींवर दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ९ महिला, ४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.

मृतांमध्ये ९ जण बिहारचे, ८ जण दिल्लीचे आणि एक हरियाणाचा आहे. स्टेशनवर प्रचंड गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली आणि अनेक प्रवासी गुदमरून बेशुद्ध पडले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

पोलिस उपायुक्त (रेल्वे) यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, प्रयागराज एक्सप्रेस ट्रेन निघण्याची वाट पाहत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर आधीच गर्दी होती.

अधिकाऱ्याने सांगितले की, स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होत्या आणि या गाड्यांमधील प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक १२, १३ आणि १४ वर देखील उपस्थित होते. रात्री ९.५५ वाजता चेंगराचेंगरी सुरू झाली, ज्यामुळे अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करावी लागली. 

चेंगराचेंगरीत आई गमावलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, आम्ही बिहारमधील छपरा येथे जात होतो जिथे आमचे घर आहे. आम्ही एका ग्रुपमध्ये होतो. लोक एकमेकांना ढकलत होते. या गोंधळात आणि चेंगराचेंगरीत माझी आई मृत्युमुखी पडली. माझ्या आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माझ्या आईचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.  त्याच कुटुंबातील एक महिला धक्यामुळे बेशुद्ध पडली.

धर्मेंद्र सिंह नावाच्या एका प्रवाशाने या घटनेबद्दल सांगितले की, “मी प्रयागराजला जात होतो, पण अनेक गाड्या उशिरा आल्या, अनेक रद्द झाल्या, स्टेशनवर प्रचंड गर्दी होती. या स्टेशनवर मी नेहमी पाहतो त्यापेक्षा जास्त लोक स्टेशनवर होते. माझ्या समोर, ६ ते ७ लोकांना स्ट्रेचरवर नेण्यात आले.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here