विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी या नावाला 16 पक्षांची पसंती

0

नवी दिल्ली,दि.20: ‘इंडिया’ आघाडीची मंगळवारी नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध निवडणूक लढताना कोणाच्या चेहरा घेऊन लढायचं यावर ‘इंडिया’ आघाडीने एक नाव निश्चित केल्याचं समजतं. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी दलित चेहरा घेऊन भाजपाला आव्हान देण्याची मोर्चेबांधणी ‘इंडिया’ आघाडीने केली आहे. आघाडीमधील नेत्यांनी मोदींविरुद्ध लढण्यासाठी कोणत्या नेत्याचा चेहरा वापरावा यासंदर्भातील चर्चेमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर अंतिम निर्णय झाला नसला तरी संबंधित प्रस्तावावर खरगेंनी पत्रकार परिषदेमध्ये थेट नकारही दिला नाही. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना खरगेंनी, “आधी एकत्र येऊन जिंकू, मग पंतप्रधानपदाचा विचार करु,” असं म्हटलं.

ममता बॅनर्जींनीही मांडला प्रस्ताव

दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये ‘इंडिया’ आघाडीची बैठक पार पडली. इंडिया आघाडीसाठी निमंत्रक किंवा समन्वयक असला पाहिजे असा मुद्दा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बैठकीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित केला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही हाच मुद्दा उपस्थित करत पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यासाठी बॅनर्जी यांनीही खरगेंच्या नावाचाच प्रस्ताव मांडला. खरगेंच्या नावावर कोणीही आक्षेप घेतला नाही.

खरगेंना जवळपास सर्वांचाचा पाठिंबा

आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि द्रमुकचे नेते तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलनि यांनी खरगेंच्या नावाला पाठिंबा दर्शवला. ‘इंडिया’ आघाडीतील 28 पैकी 16 पक्षांनी खरगेंच्या नावाला पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाचाही खरगेंना पाठिंबा आहे. मात्र पंतप्रधान पदासाठी खरगेंचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे की नाही याबद्दल पत्रकार परिषदेत भाष्य करणं टाळलं. “पंतप्रधान होण्यासाठी खासदारांची पुरेशी संख्या आवश्यक आहे,” असं उत्तर खरगेंनी दिलं.

‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीमध्ये, नरेंद्र मोदींसमोर उभे राहू शकतील असे एकमेव विश्वासार्ह, अनुभवी नेते खरगेच आहेत. दलित व आदिवासी हे काँग्रेसचे पारंपारिक मतदार भाजपाने जाणीवपूर्वक हिरावून घेतले आहेत. त्यासाठी दलित किंवा आदिवासी चेहऱ्यांची काँग्रेसला गरज होती. खरगे हे ‘इंडिया’मधील घटक पक्षांनाही आपलेसे वाटतात. रामनाथ कोविंद व द्रौपदी मुर्मू या भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या विरोधात काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे काँग्रेस दलित व आदिवासीविरोधात असल्याचे चित्र भाजपने निर्माण केले आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी खरगे हेच उत्तम उमेदवार असल्याचं या बैठकीतील मुद्द्यामध्ये नमूद करण्यात आल्याचं समजतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here