10th 12th exam news: दहावी, बारावीच्या परीक्षा या पद्धतीने होणार राज्य मंडळाचा निर्णय

0

मुंबई,दि.३: 10th 12th exam news: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणार की ऑफलाइन पद्धतीने घेणार याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षा (Maharashtra SSC HSC Exam Offline) आधी नियोजित वेळेनुसार ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्य माध्यमिक आणि मंडळाने आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र असणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेतच त्यांनी परीक्षा (Board Exams 2022) द्यायची आहे. यंदा परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ दिल्यामुळे परीक्षा ११ ऐवजी १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. त्याआधी दहा मिनिटे म्हणजे १०.२० वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येईल. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी, बारावी परीक्षांसंबंधीची सर्व माहिती आणि यंदाच्या परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना या पत्रकार परिषदेत दिल्या.

ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षा देता येणार नाही त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा देता येईल, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले. यंदा दहावीची परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरू होणार आहे आणि ४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त १५ मिनिटे आणि ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. यंदा आतापर्यंत परीक्षेसाठी बारावीच्या १४ लाख ७२ हजार ५६२ विद्यार्थ्यांची नोंदणी तर दहावीच्या १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

लसीकरण बंधनकारक नाही

लसीकरणाचे बंधन कोणाला करता येत नाही. त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे बंधन नसले तरी आम्ही विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी पुरेसा अवधी दिला आहे,त्यामुळे त्यांच्या पालकांनी लसीकरण पूर्ण करावे, असे गोसावी यांनी सांगितले. आतापर्यंत राज्यभरात दहावी आणि बारावीच्या ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

परीक्षेसंदर्भातले अन्य महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे –

– दहावी, बारावी परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार पेन, पेपर पद्धतीनेच

– लेखी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ

– ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त १५ मिनिटे

– ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ

– लेखी परीक्षा सकाळी ११ ऐवजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार

– विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्र येईल, अशी व्यवस्था बोर्ड करणार

– विद्यार्थी संख्या अधिक असेल तर शाळेच्या जवळचेच परीक्षा केंद्र

– एका शाळेत १५ पेक्षा जास्त परिक्षार्थो असतील तर तिथे परीक्षा केंद्र करणार

– गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ करण्यात येणार


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here