मुंबई,दि.23: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 10 खासदार बसपा सोडण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यापैकी 4 खासदार भाजपाच्या संपर्कात आहेत, तर 3 खासदार काँग्रेसच्या आणि 3 खासदार समाजवादी पक्षाच्या संपर्कात आहेत. अमरोहाचे बसपा खासदार दानिश अलीबद्दल बोलायचे झाले तर त्यांना राहुल गांधींचा पाठिंबा मिळाला असून काँग्रेसही त्यांना अमरोहामधून तिकीट देणार आहे.
बिजनौर मलूक नगरमधील बसपा खासदारांबद्दल बोलायचे तर ते भाजपाच्या संपर्कात आहेत तर लालगंजच्या खासदार संगीता आझाद भाजपच्या संपर्कात आहेत. अफझल अन्सारी यांना यापूर्वीच गाझीपूरमधून सपाचे उमेदवार बनवण्यात आले आहे, श्रावस्तीचे बसप खासदार राम शिरोमणी वर्मा यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे, अशा परिस्थितीत मायावती यांनी कोणतीही युती न करता एकट्याने लोकसभा निवडणूक लढवल्यामुळे त्यांचे भवितव्य अधांतरी आहे. सर्वजण आपापल्या योजना बनवण्यात व्यस्त आहेत.
मायावती इंडिया आघाडीचा भाग होतील अशी आशा होती
अखेरच्या क्षणी बसपा इंडिया आघाडीचा भाग होईल, अशी आशा सर्वांना वाटत होती, मात्र दोन दिवसांपूर्वी मायावतींच्या वक्तव्यानंतर सर्वजण आपलं भविष्य घडवण्यात व्यस्त आहेत. आंबेडकर नगरचे बसपा खासदार रितेश पांडे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रतिक्षेत आहेत, घोशीतील बसपाचे खासदार अतुल राय भाजपाची वाट पाहत आहेत, जौनपूरचे बसपा खासदार श्याम सिंह यादव हे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या संपर्कात असून निमंत्रणासाठी उत्सुक आहेत.

युती केल्यास निवडणुकीत नुकसान होईल
गेल्या महिन्यातच बहुजन समाज पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत एकट्याने लढण्याची घोषणा केली होती. बसपा अध्यक्ष मायावती म्हणाल्या होत्या की, कोणत्याही पक्षासोबत युती केल्यास निवडणुकीत नुकसान होईल. त्यामुळे त्यांनी एकट्याने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशात आम्ही एकहाती निवडणूक लढवून सरकार स्थापन केल्याचे मायावती म्हणाल्या होत्या.
याच अनुभवाच्या जोरावर सार्वत्रिक निवडणुकीतही आम्ही एकटेच लढणार आहोत. आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही. आमचा पक्ष युती करण्याऐवजी एकटाच निवडणूक लढवतो कारण पक्षाचे नेतृत्व दलिताच्या हातात आहे. युती करून विरोधी पक्षाला बसपाची मते मिळतात, पण इतरांची मते मिळवता येत नाहीत. सपा आणि काँग्रेसला 90 च्या दशकात झालेल्या युतीचा फायदा झाला होता.