कोल्हापूर,दि.17: औषधाची गोळी खाताना ठसका लागल्याने तरुणाचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरुळ येथील एका तरुणाचा वाढदिवसाला तीन दिवस बाकी असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर वाढदिवसा दिवशीच रक्षाविसर्जन करण्याची वेळ आली आहे. प्रतीक प्रकाश गुरव असं मृत पावलेल्या 17 वर्षीय तरुणाचं नाव आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत प्रतीकला गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला याचा त्रास सुरू होता. यावर औषधोपचार देखील सुरू होता. दरम्यान गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास प्रतीक आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी आला होता. यानंतर त्याने घरी येऊन रात्रीचं जेवण केलं. जेवणानंतर त्याने औषधाची एक गोळी गिळण्यासाठी घेतली. पण गोळी तोंडात टाकताच त्याला जोराचा ठसका लागला आणि औषधाची गोळी प्रतीकच्या श्वसननलिकेत जाऊन अडकली. यामुळे प्रतीकला गुदमरल्यासारखं वाटू लागलं.
यानंतर वडिलांनी त्वरित प्रतीकला गावातील रुग्णालयात दाखल केलं. पण गावातील डॉक्टरांनी प्रतीकला तातडीने कोल्हापूर येथे घेऊन जाण्यास सांगितलं. पण तोपर्यंत प्रतीकची प्रकृती आणखीच बिघडत चालली होती. कोल्हापुरात गेल्यानंतर उपचारापूर्वीच डॉक्टरने प्रतीकला मृत घोषित केलं. ठसका लागल्याने औषधाची गोळी श्वसननलिकेत अडकली. परिणामी श्वास घ्यायला त्रास झाल्याने हृदयावर ताण येऊन प्रतीकचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
विशेष म्हणजे आज (रविवारी) प्रतीकचा वाढदिवस आहे. वाढदिवसाला तीन दिवस बाकी असताना, गुरुवारी प्रतीकचं दुर्दैवी निधन झालं आहे. त्यामुळे प्रतीकच्या वाढदिवशीच रक्षाविसर्जनाची वेळ आली आहे. अशाप्रकारे प्रतीकचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.