Yashwant Jadhav: शिवसेना नेत्याच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड

0

मुंबई, दि.२५:Yashwant Jadhav Income Tax Raid: महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सीबीआय (CBI), ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेचे अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. नवाब मलिक यांची ३ मार्च पर्यंत ईडी कोठडीत रवानगी करण्यात आली. आता केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगाव येथील घरावर धाड टाकली आहे. इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले.

त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु केल्याचे समजते. सध्या त्यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. परंतु, यशवंत जाधव यांची नेमकी कोणत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. यशवंत जाधव हे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जातो. त्यामुळे आता संजय राऊत यांच्यानंतर शिवसेनेचा आणखी एका नेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे.

हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो. विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ मंत्रालयाशेजारी महाविकासआघाडीचे जे धरणे आंदोलन झाले होते त्यामध्ये यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव सहभागी झाल्या होत्या. त्याच्याच दुसऱ्या दिवशी यशवंत जाधव यांच्या घरी धाड पडल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

सुरुवातीला ईडीने ही धाड टाकल्याचे सांगितले जात होते. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपण यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही आयकर विभागाची धाड असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळेच आयकर विभागाने ही धाड टाकली असल्याची माहिती पुढे आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here