वाराणसी ज्ञानवापी मशिद वाद, महाराष्ट्रातही या शहरात मंदिर मशिद वाद पेटणार?

0

पुणे,दि.23: उत्तर प्रदेश येथील वाराणसीत मशिद मंदिर वाद सुरू आहे. ज्ञानवापी मशिदीतील (Gyanvapi Masjid) सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू बाजूने केला जात आहे, तर मुस्लिम बाजूने ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा करण्यात आला आहे. आजपासून जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणाची (District Court) सुनावणी होणार आहे. या पूर्ण प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. ज्ञानवापीचा मुद्दा तापत असताना आता पुण्यातील पुण्येश्‍वर आणि नारायणेश्‍वर मंदिरांच्या (Puneshwar Narayaneshwar Mandir) जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील या दोन मंदिरांच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत, या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी काल जाहीर केलं आहे.

कालच्या सभेत बोलताना अजय शिंदे यांनी म्हटलं की, पुण्येश्वराला पण तेवढाच मोठा इतिहास आहे. अल्लाउद्दीन खिलजीचा एक सरदार बडा अरब पुण्यावर चाल करुन आला त्यावेळी त्यानं हे भगवान शंकराचं मंदिर उध्वस्त केलं. एक मंदिर नाही तर दोन मंदिरं उध्वस्त केली. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरं उध्वस्त केली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही दोन्ही मंदिरं कुठं आहेत. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडील बाजूला कुंभार वेसजवळ आहे. जिथं आज छोटा शेख दर्गा आहे. या सगळ्या मंदिरांच्या वर मशिदी निर्माण झाल्या आहेत, असा दावा अजय शिंदे यांनी केला आहे.

अजय शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर आता मनसेची नेमकी भूमिका काय असेल याकडे लक्ष असणार आहे. कालच्या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा काढला होता. मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावरही त्यांनी भाष्य केलं होतं. भोंगे हटवण्यासाठीचं आंदोलन सुरुच राहील असा इशाराही राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत दिला होता. अयोध्या दौरा का स्थगित केला याविषयी देखील राज ठाकरे यांनी सविस्तर भाष्य कालच्या सभेत केलं होतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here