मुंबई,दि.७: ठाणे महानगरपालिकेतील 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. बुधवारी रात्री या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर शिवसेनेचे काही खासदारदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६६ नगरसेवकदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. ही गळती सुरु असतानाच आता ठाण्यानंतर नवी मुंबईतील जवळपास ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेतील ३० ते ३२ नगरसेवक एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक आगामी काळात शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामध्ये काही ज्येष्ठ नगरसेवकांचाही समावेश आहे. नवी मुंबईत शिवसेनेचे एकूण ५० नगरसेवक आहेत. त्यामुळे ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईमध्येही उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
याआधी ठाणे महानगरपालिकेतही उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसला आहे. ठाण्यात शिवसेनेचे एकूण ६७ नगरसेवक आहेत. त्यातील ६६ नगरसेवकांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.