शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसणार?

0

मुंबई,दि.७: शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आमदारानंतर आता खासदार बंड करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील खासदारांमध्येही चलबिचल असल्याचे दिसत आहे. जवळपास १२ खासदार हे शिंदेंसोबत जातील, असे म्हटले जात आहे. त्यातच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या खासदारांमध्ये दोन गट पडण्याची चिन्हे आहेत.

दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आदेश पक्षाच्या खासदारांना द्या, असे पत्र मंगळवारीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे.  शिंदे यांच्यासोबत जाण्याची स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या एकाही खासदाराने आतापर्यंत घेतलेली नाही. मात्र, १२ खासदार हे शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जाते. माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी तसा दावा केला आहे. शिवसेनेच्या चार खासदारांनी बंडाच्या काळात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले होते. भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा दबाव पक्षातील अधिकाधिक खासदारांकडून येऊ शकतो. 

खासदार फुटले तर राज्यातील सत्ता हातून गेलेल्या ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का बसेल. पक्षावरील ताब्यावरून नजीकच्या काळात ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्या संघर्षात खासदारही साथ सोडून गेले तर ठाकरे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे.

काय निर्णय घेणार?
भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी आधीच घेतली आहे. अशावेळी त्यांनी काँग्रेस व विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर शिवसेना खासदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. 

यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला तर खासदार फुटतात आणि द्रौपदी मुर्मू यांच्या पाठीशी उभे राहिले तर सत्ता हिसकावून घेणाऱ्या भाजपबरोबर जावे लागेल, अशी उद्धव ठाकरे यांची कोंडी होऊ शकते. मात्र, दोनपैकी एक निर्णय त्यांना घ्यावाच लागेल. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here