मुंबई,दि.१३: अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. बहुसंख्य आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत. यातील २२ आमदार परत शरद पवार गटात येतील असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. लोकसभा २०२४ जागा वाटपात अजित पवार गटाला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीत भाजपा सर्वाधिक जागा त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) यांना ९ ते १० जागा व अजित पवार गटाला ३ ते ४ जागा मिळण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कोंडी होत आहे. महायुतीच्या जागावाटपात अजित पवार गटाला एका हाताच्या बोटावर मोजता येथील एवढ्याच जागा मिळतील, असा दावा केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत मोठा दावा केला आहे. दैनिक लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.
लोकमतच्या वृत्तानुसार अजित पवार गटाचे २२ आमदार माघारी फिरून पुन्हा शरद पवार गटात येतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. याबाबत मोठा दावा करताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार गटामधील २२ आमदारांना परत शरद पवार यांच्याकडे यायचं आहे. तसेच अजितदादांसोबत असलेल्या १२ आमदारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवणं, फायदेशीर ठरेल असं वाटत आहे, असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे.
शिंदे गटातील अनेक जणांना भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची आहे, असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरूनही रोहित पवार यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत ९ जागा लढायला मिळतील, अशी आशा होती. मात्र त्यांना केवळ ४ जागांवरच समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे.
आता लोकसभा निवडणुकीला अशी स्थिती असेल तर विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर कुणीच उभं राहणार नाही. सगळे भाजपाकडून कमळ चिन्हावर लढतील. त्यामुळेच अजित पवार गटात काही जण असे आहेत जे अजित पवार यांना भाजपामध्ये जावं, असा सल्ला देत आहेत, असा दावाही रोहित पवार यांनी केला.