पुणे,दि.१५: देशासाठी शहीद होणारा जवान खरा हिरो आहे. असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी म्हटले आहे. “देशासाठी सीमेवर २१ वर्षाचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो, आर्यन हिरो नाही, मी अत्यंत स्पष्ट सांगतो. शाहरुख आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाही.” असं माध्यमांशी बोलताना अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.
ब्राह्मण महासंघाच्यावतीने पुण्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विक्रम गोखले यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करत विविध मुद्द्य्यांवर प्रतिक्रिया दिली. त्याचप्रमाणे मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणावर देखील ते बोलले.
विक्रम गोखले यांनी अभिनेत्री कंगणा रणौत हिने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानला देखील समर्थन दिले. “खरंय, कंगना रणौत जे म्हणालेली आहे, की ते भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलं गेलं आहे बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही त्यांनी. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे मी.” असं कंगना रणौतच्या विधानावर प्रतिक्रिया देताना विक्रम गोखले म्हणाले.
राज्यातील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेना व भाजपा युतीबाबतही मत व्यक्त केलं. तसेच, यावेळी त्यांनी शिवसेना व भाजपाला एकत्र येण्याचा सल्ला देत सूचक इशारा देखील दिल्याचं दिसून आलं.