दि.7: WhatsApp हे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. WhatsApp वर सर्वात जास्त मेसेज शेअर केले जातात. व्हाट्सॲप महत्वाची माहिती, ताज्या घडामोडी अनेकांना कळतात. इंटरनेट आणि सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे सतत या गोष्टींचा वापर करणाऱ्या युजर्सना थोडा वेळ जरी ही सेवा बंद झाली तर अस्वस्थ होतं. आधीच्या काळात वीज गेल्यावर जसं काय करायचं? हा प्रश्न पडायचं तसंच काहीसं होतं.
इंटरनेट नसलं किंवा व्हॉट्सॲप नसेल तर अवघड होतं सोमवारी काही काळ असंच घडलं. जगभरातील फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची (WhatsApp) सेवा सोमवारी सहा तासांहून अधिक काळ बंद पडली होती. भारतात सोमवारी रात्री 9 वाजल्यापासून फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाली. यामुळे युजर्स गोंधळून गेले. सुरुवातीला काय झालं हेच नक्की कुणाला समजत नव्हतं. डेस्कटॉप तसंच मोबाइलवर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप काम करत नव्हतं. त्यामुळं अनेक युजर्सनी एकमेकांशी संपर्क साधला. त्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप ठप्प असल्याचं समोर आलं.
या प्रकारानंतर आता यासंबंधीचा एक ऑडिओ संदेश व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओ संदेशात भारतात व्हॉट्सॲप बंद ठेवण्याचा दावा केला जात आहे. केंद्र सरकारने दररोज 11:30 ते सकाळी 6:00 पर्यंत व्हॉट्सॲप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सॲपवरील वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असं या व्हायरल ऑडिओ संदेशात सांगितलं जात आहे.
व्हायरल मेसेजमध्ये पुढं असंही म्हटलं आहे की, जर तुम्ही हा मेसेज किमान 10 लोकांना फॉरवर्ड केला नाही तर 48 तासांत तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट अवैध मानलं जाईल आणि ते बंद केलं जाईल. अकाउंट डिलिट केल्यानंतर व्हॉट्सॲप सुरू करण्यासाठी दरमहा 499 रुपये शुल्क आकारलं जाईल. विनामूल्य सेवा सुरू ठेवण्यासाठी किमान 10 लोकांना हा संदेश फॉरवर्ड करा. हा मेसेज काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला. व्हॉट्सॲप बंद होणार असल्याने युजर्सही नाराज झाले.
अनेक युजर्स ह्या मेसेजमधील दाव्याची पडताळणी करत होते. त्यानंतर हा मेसेज फेक असल्याचं उघडकीस आलं. व्हायरल ऑडिओ मेसेजमध्ये व्हॉट्सॲप बंद होण्याचा केलेला हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. व्हॉट्सॲपबाबत सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. हा मेसेज खोटा असल्याने युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.
हा मेसेज दोन वर्षांपूर्वीही व्हायरल झाला होता. त्यानंतर हा मेसेज पुन्हा व्हायरल होत आहे. नुकतंच व्हॉट्सॲप काही काळ बंद पडले. त्यामुळे युजर्स व्हॉट्सॲप 6 तास वापरू शकले नाहीत. त्यामुळे अनेकांना वाटू लागलं की व्हॉट्सॲप बंद पडलं आहे. जेव्हा व्हॉट्सॲप पुन्हा सुरू झालं तेव्हा काही नतद्रष्ट लोकांनी हा फेक संदेश पसरवायला सुरुवात केली.