Shivsena Vardhapan Din: हार जीत होत असते, उद्याची निवडणूक जिंकणार आहोतच: उध्दव ठाकरे

0

मुंबई,दि.19: Shivsena Vardhapan Din: शिवसेनेच्या (Shivsena) 56 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सूचक शब्दात भाष्य करताना भाजपवर कडाडून हल्ला चढवला.  विधान परिषदेत गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका बसू नये यासाठी शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व आमदारांशी मुंबईतील वेस्टन इन हॉटेलमध्ये संवाद साधला.

56 वर्षाच्या बऱ्याच गोष्टी मनात ताज्या झाल्या असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. अनेक शतकं शिवसेना राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडलं, घाम गाळला त्यांचा मला अभिमान आहे. मला निवडणुकीची चिंता नाही. हार जीत होत असते, उद्याची निवडणूक जिंकणार आहोतच, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

हृदयात राम आणि हाताला काम हेच चित्र देशात दिसत आहे, भाडोत्री सैन्य हा प्रकार आहे ? मग भाडोत्री राजकारणासाठी सुद्धा टेंडर काढा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अग्नीपथ योजनेवरून हल्लाबोल केला. हातात काम नसेल, तर राम राम करण्यात अर्थ नाही, अशी वचन द्यावीत जी पाळता येतील, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अग्नीपथ योजनेवरून मोदी सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. देशातील तरुणांवर ही वेळ का आली? मत म्हणजे आयुष्य असतं, शिक्का नव्हे, अग्निपथ योजना मृगजळ असल्याचे ते म्हणाले. भाडोत्री सैन्य हा प्रकार आहे ? मग भाडोत्री राजकारण्यांसाठी सुद्धा टेंडर काढा, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला. 

राज्यसभेत एकही मत फुटले नाही. कोणी कलाकारी केल्या ते माहित आहे. उद्याच्या निवडणुकीत फाटाफुटीची शक्यता नाही. शिवसेनेत गद्दार कोणी राहिला नाही. शिवसेना मजबुतीनं उभी राहिली. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही. शेराला सव्वाशेर असतोच असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. 

मत म्हणजे फक्त शिक्का नसतो तर आयुष्य असतं. शिवसेनेचे नेते सचिन अहिर चांगले काम करत आहे. गेल्या दोन वर्षात त्यांची टेस्ट घेतली. चांगलं काम करत आहे. शिवेसेनेचे दोन्ही उमेदवार चांगले आहेत. शिवसेनेत संधी नाही मिळाली तर कोणी नाराज होत नाही. शिवसैनिक मिळेल त्या संधीचं सोनं करतात. दिवसागणिक आपली यशाची कमान वाढती राहो, अशी आशा यावेळी उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.   

हीच आजची लोकशाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना हाॅटेलमध्ये ठेवण्यावरूनही भाष्य केले. नाही म्हटलं, तरी आमदारांची बडदास्त ठेवावी लागते, यालाच लोकशाही म्हणत असल्याचे खोचक शब्दात सांगितले. राज्यसभा निवडणुकीत एकही मत फुटलं नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीची चिंता नसल्याचे ते म्हणाले. कितीही फाटाफूट झाली, तरी शिवसेना ताकदीने उभी राहिली आहे. आईचा दुध विकणारा शिवसेनेत नकोत हे बाळासाहेबांचे वाक्य फार महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here