“रस्त्यावर सगळेच यायला लागले तर फार अवघड परिस्थिती होईल” पंकजा मुंडे

0

बीड,दि.8: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यात जाळपोळ झालेल्या ठिकाणी भेट दिली. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जाळपोळ, आमदारांची घरे जाळण्याचा प्रकार घडला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडलीय, याचा तीव्र निषेध करते, अशा शब्दांत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी निषेध व्यक्त केला आहे.

जाळपोळ आणि हिंसाचार यासह अंतरवली सराटीमधील लाठी चार्जची उच्चस्तरीय चौकशी करावी. पोलिसांचा इंटेलिजन्स कमी पडला, अशी टीका पंकजा यांनी केली आहे. 

“आंदोलनकर्ते, आरक्षण मागणाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राच्या या संस्कृतीला साजेशी आंदोलने इतिहासात झालेली आहेत. कधी अशी घटना घडली नाही. अशी घटना परत पाहायला लागू नये, अशी माझी सर्वांना विनंती आहे. तुमच्या पेक्षा वेगळी कुणाची भूमिका असेल तर त्याला दहशत वाटावी, याला आंदोलन म्हणता येत नाही. आंदोलनाचं रुपांतर आतंकात नको व्हायला. रस्त्यावर सगळेच यायला लागले तर फार अवघड परिस्थिती होईल”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“मराठा आरक्षणाच्या विषयात केवळ शब्द आणि डेडलाईन घेण्यापेक्षा खरीखुरी चर्चा घडून आली पाहिजे. ज्यांच्याकेड संविधानिक डेटाबेस अशा लोकांकडून चर्चा घडून आली पाहिजे आणि विषय मिटवला पाहिजे. कुणाचंही आरक्षण मारुन कुणी देत नसतं हे नैसर्गिक आहे. संविधानात बसेल तसं आरक्षण दिलं तर टिकेल आणि समाजातील शांतता टिकेल”, असं पंकजा म्हणाल्या.

सामान्य जनतेचं कौतुक वाटतं

“मला बीड जिल्ह्याच्या सामान्य जनतेचं कौतुक वाटतं. जेव्हा नेत्यांच्या घरावर हल्ले झाले तेव्हा आजूबाजूला असलेल्या वस्त्यातील सर्व जातीधर्माच्या दलित, मुस्लिम समाजाच्या बांधवांनी मदत करुन त्यांना बाहेर काढलं. हे महाराष्ट्राचं खरं चित्र आहे. हिंसक चित्र पुन्हा दिसू नये, अशी माझी विनंती आहे. कोणत्याही वर्गाला इतकं अस्वस्थ करु नये की त्याचा परिणाम पुढे आपल्याला अनुभवायला मिळेल, आपण कधी विचारही केला नसेल, असा परिणाम होऊ नये, अशी सगळ्यांनी शास्वती घ्यायची गरज आहे. मी या घटनांचा निषेध करते. कोणत्याही जाती, धर्मावर हल्ला होऊ नये”, असं पंकजा म्हणाल्या.

कुणी एक दिवसात, एक महिन्यात नेता…

“आरक्षणाच्या लढाईत आपण धाक निर्माण करु शकतो. पण भीती निर्माण होता कामा नये. तरुणाईला अशा गोष्टींकडे वळवल्यास भविष्यात आरक्षण मिळालं तरी सुरक्षित राहणार नाही. तरुणाई अशा ठिकाणी वळू नये याची जबाबदारी नेतृत्वाची आहे. कुणी या तरुणाईचं नेतृत्व स्वीकारलं असेल त्याच्यावर ही जबाबदारी आहे. कुणी एक दिवसात, एक महिन्यात, एक तपात नेता होत असेल त्या सर्वांची याबाबत जबाबदारी आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“आपल्या तरुणाईला अशा हिंसक गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे. अशा घटना घडल्या तर नेत्यांनी संवेदना व्यक्त केल्या पाहिजेत. मला वाईट वाटतंय, माझ्या आंदोलनाबाबत असं झालं असतं तर मी क्षमा मागितली असती. अशा गोष्टी नेतेच थांबवू शकतात. असं जो करतोय तो मराठा आरक्षणाला बदनाम करतोय, असं आवाहन करा. अशी घटना पुन्हा घडणार नाही”, असं मत पंकजा यांनी मांडलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here