दि.27: टीम पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला जोरदार धक्का दिला आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून मानहानीकारक पराभव करत इतिहास रचला. पाकिस्तानच्या या विजयावर बोलताना त्यांचा माजी फास्ट बॉलर वकार युनूसची (Waqar Younis) जीभ घसरली आहे. या विजयाचा विश्लेषण करताना वकारने धर्म मध्ये आणला. ‘भारत पाकिस्तान मॅचदरम्यान हिंदूंच्या मध्ये मोहम्मद रिझवानने नमाझ पठण केलं. त्याच्या बॅटिंगपेक्षा हे जास्त आनंद देणारं होतं,’ असं वकार युनूस म्हणाला.
आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये भारताला एकदाही पराभूत न करु शकलेल्या पाकिस्तानमध्ये यानंतर एकच जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र यावेळी सामन्याचे मूल्यांकन करताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनिसने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सामन्यादरम्यान पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानने मैदानावरच नमाज पठण केलं होतं. या नमाजाबाबत वकारने एका पाकिस्तानी चॅनेलशी संभाषण करताना केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. भारताच्याही माजी खेळाडूंनी यावरुन नाराजी जाहीर करत वकारला सुनावलं होतं. त्यानंतर अखेर वकार युनिसने माफी मागितली आहे.
वकार युनिसने ट्वीट करत माफी मागितली आहे. “त्या उत्साहाच्या क्षणी मी असं काहीतरी बोललो ज्यामुळे अनावधानाने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. मी यासाठी माफी मागतो. हे जाणीवपूर्वक झालेलं नव्हतं. माझ्याकडून झालेली चूक होती. तुमचा धर्म, रंग आणि वंशाचा विचार न करता खेळ सर्वांना एकत्र आणतो,” असं वकारने म्हटलं आहे.