Wagholi Heavy Rain: मुसळधार पावसामुळे वाघोलीतील शेतीचे मोठे नुकसान 

0
वाघोली

सोलापूर,दि.२८: Wagholi Heavy Rain: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मोहोळ तालुक्यातील वाघोली (Wagholi) येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वाघोली, वाघोलीवाडी तसेच गावडे वस्ती परिसरात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे वाघोलीतील अनेक भागात पाणीच पाणी साचले आहे. वाघोलीतील बसवेश्वर बेडगे यांच्या शेतात पाणी साचल्याने तूर, मका, उडीद पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. माजी सरपंच मुकुंद पाटील यांच्या शेतात पाणी साचल्याने ऊसाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. तर वाघोलीवाडीतील लिंगाप्पा बेडगे व शिवाजी बेडगे यांच्याही शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. (Wagholi Heavy Rain News) 

मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर, धाराशिव तसेच लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पूर आला आहे. आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे पुन्हा काही दिवस मुसळदार पावसाचा इशारा दिलाय. 

Wagholi Heavy Rain
वाघोली

दिवसभर कधी हलका तर कधी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार पावसामुळे होटगी येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पाणी पुलावरुन वाहत आहे. त्याचप्रमाणे जुना पुणे नाका येथील नाल्याचेही पाणी वाढल्यामुळे सायंकाळी वसंत विहारजवळील नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. नाल्याचे पाणी आर्यनंदी नगरात शिरले.

सध्या सोलापुरात एनडीआरएफ व लष्कराच्या हेलिकॉप्टर द्वारे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना बचाव करण्याचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत १२९ गावातील ४ हजाराहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. शनिवारी सकाळपासून सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे,

बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र आता तीव्रतेने कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. ते ओडिशावर केंद्रित आहे आणि पुढील २४ तासांत दक्षिण छत्तीसगडकडे सरकत कमकुवत होईल. ३० सप्टेंबर रोजी उत्तर अंदमान समुद्रावर एक वरच्या हवेचा चक्राकार प्रवाह तयार होण्याची शक्यता आहे, यामुळे १ ऑक्टोबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरावर एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. यामुळे, २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान पूर्व आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. २८ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात खूप मुसळधार पाऊस पडू शकतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here