दि.१३: विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपट चर्चेत आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. देशात ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट तुफान कमाई करत असताना चित्रपटावर मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवल्याचा आरोपही केला जात आहे. हा चित्रपट जातीयवादी आणि विशिष्ट राजकीय विचारसरणीला प्रोत्साहन देण्यासाठी बनवला गेला आहे, असे आरोपही या चित्रपटावर होत आहेत. या वादादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या चित्रपटाबद्दल वक्तव्य केलं आहे. सत्तेतले लोक या चित्रपटाचं प्रमोशन करतायत हे दुर्दैव असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता विवेक अग्निहोत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर उत्तर दिले आहे. (Vivek Agnihotri responds to Sharad Pawar’s statement on The Kashmir Files)
यावर विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्वीट करत उत्तर दिले आहे. “या व्यक्तीचे नाव विवेक रंजन अग्निहोत्री आहे. काही दिवसांपूर्वी जो तुम्हाला विमानात भेटला होता, त्याने तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला होता. त्यानंतर तुम्ही काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावर सर्वोत्कृष्ट चित्रपट बनवल्याबद्दल या व्यक्तीचे आणि त्याच्या पत्नीचे अभिनंदन केले.” असे ट्वीट विवेक अग्नीहोत्रींनी केले आहे.
शरद पवार म्हणाले होते
शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीविषयी ANI ने ट्वीट करत माहिती दिली. यात शरद पवार ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर निशाणा साधत म्हणाले, “एका माणसाने चित्रपट (द काश्मीर फाईल्स) बनवला असून त्यात हिंदूंवर होणारे अत्याचार दाखवले आहेत. या सिनेमात असं दाखवण्यात आलंय की बहुसंख्याक नेहमीच अल्पसंख्याकांवर हल्ले करतात आणि जेव्हा मुस्लीम बहुसंख्य असतात तेव्हा हिंदू समाज असुरक्षित होतो. सत्तेतील लोक या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत हे दुर्दैव आहे.”