राज्याच्या विविध भागात हिंसाचार, त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात

0

मुंबई,दि.13: त्रिपुरात घडलेल्या कथित अत्याचाराच्या (Tripura violence) घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विविध भागांत शुक्रवारी निषेध मोर्चा काढण्यात आले. मात्र, या निषेध मोर्चाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं. नांदेडमध्ये सुद्धा काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान दगडफेक (Stone pelting in Nanded) झाली. याप्रकरणी आता नांदेड पोलिसांनी इतवारा पोलीस स्टेशनमध्ये 250 जणांवर कलम 307 आणि दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शिवाजीनगर येथे दगडफेक प्रकरणी 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही आरोपीना ताब्यात घेतले आहे.

त्रिपुरा राज्यातील हिंसाचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे. तसेच पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळावी आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी राज्यातील अनेक शहरांत शुक्रवारी मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले. या मोर्चाला नांदेड, मालेगाव, अमरावती आणि आणखी काही ठिकाणी हिंसक वळण लागले. त्यात काही भागांत दगडफेकीच्या घटना घडल्या. तेथील स्थिती आता नियंत्रणात असून मी यावर लक्ष ठेवून आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्थितीबाबत अपडेट्स मी घेत आहे. या स्थितीत धार्मिक तणाव निर्माण होऊ न देता सर्वांनी शांतता बाळगावी, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here