Vinayak Mete: विनायक मेटे अपघातप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Vinayak Mete Accident Update: सीआयडीचा तपास पूर्ण झाला असून मेटेंच्या कारचा चालक हाच अपघातास कारणीभूत असल्याचे समोर आले आहे

0

मुंबई,दि.16: 14 ऑगस्टला शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर एकीकडे राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत असताना दुसरीकडे घातपाताचा संशय देखील व्यक्त केला जात होता. विशेषत: विनायक मेटेंचा अपघात (Vinayak Mete Accident) झाल्यानंतर जवळपास तासभर तिथे मदत पोहोचली नाही, असा देखील दावा केला जात होता.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ तीन महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सीआयडीचा तपास पूर्ण झाला असून मेटेंच्या कारचा चालक हाच अपघातास कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. 

अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मेटे बीडकडून मुंबईकडे येत होते. पहाटे पाच वाजता हा अपघात झाला होता. चालकाने मेटेंना तासभर मदतच मिळाली नसल्याचा आरोप केला होता. चालक एकनाथ कदम याने रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत, असे म्हटले होते. 

ज्या ज्या मार्गावरून विनायक मेटे यांची कार अपघातास्थळापर्यंत पोहोचली त्या मार्गांवरील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्हिडिओ फुटेज सीआयडीने तपासले होते. याशिवाय या अपघातामध्ये कोणाची चूक दिसते आहे? हे समजून घेण्यासाठी आयआरबीचे इंजिनीअर, आणि इतर रोड इंजिनीअर्सची एक तांत्रिक समिती बनवून त्यांच्याकडून एक मत घेण्यात आलं होतं.

आता हाच चालक दोषी असल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे. विनायक मेटेंच्या कारचा चालक एकनाथ कदमवर  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीआयडीने रसायनी पोलीस ठाण्यात 304 a, 304 -2 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

कदम हा मेटेंची कार 140-150 किमीच्या वेगाने चालवत होता. भातन बोगद्याजवळ आल्यावर त्याने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने उजव्या बाजुच्या लेनमध्ये गाडी घातली. परंतू तिथे आणखी एक गाडी ओव्हरटेक करत होती. ओव्हरटेक करता येणार नाही हे समजल्यावरही त्याने त्या लेनमधून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे मेटेंची कार डाव्या बाजुने आदळली. 
सकृतदर्शनी कदम हाच मेटेंच्या अपघाती मृत्यूस आणि अपघातास कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्याला लवकरच ताब्यात घेऊन अटक करण्यात येणार आहे. गुन्ह्यात वापरलेल्या कलमांनुसार कदम याला दोन ते चार वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here