Vijay Wadettiwar: राज्यसभेच्या निवडणूक निकालावरून मंत्री विजय वडेट्टीवार यांचं अपक्ष आमदारांबाबत मोठं विधानं

0

मुंबई,दि.11: राज्यसभेच्या निवडणूक निकालावरून मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अपक्ष आमदारांबाबत मोठं विधानं केलं आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या तीन जागांवर भाजपाने विजय मिळवला. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र अटीतटीच्या लढतीत भाजपाने विजय मिळवला. महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी 6 जागांवर झालेल्या निर्णयानुसार महाविकास आघाडीचे 3 तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीला धक्का बसला. या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला. राज्यसभेच्या निकालावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावं जाहीर केली.

ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीकडे संख्याबळ असताना त्यातील काही अपक्ष आणि घटक पक्षांची मते फुटली आणि त्याचा फायदा भाजपाला झाला. राज्यसभेच्या निवडणूक निकालावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच ज्या अपक्ष आमदारांची मते मविआच्या उमेदवाराला पडली नाहीत अशांना निधी देणार नाही अशी भूमिका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या विधानावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वडेट्टीवार म्हणाले की, अपक्ष आमच्यासोबत होते, राज्यसभा निवडणुकीत दगाफटका झाला. कोण कोण त्यांच्यासोबत गेले याची माहिती मिळतेय. जर आमच्यासोबत राहून निधी उपलब्ध करून घ्यायचा, विकासकामे करून घ्यायची. मग बाकीच्या मार्गाने मते विरोधकांना द्यायची. आम्ही या आमदारांना कसाला निधी देऊ असा सवाल त्यांनी केला आहे. 

तसेच सरकार म्हणून काम करताना अपक्ष आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला. आम्हीही सरकारच्या वतीने त्यांच्या मतदारसंघाना निधी उपलब्ध करून दिला. लोकशाही आहे कोण कुठे आणि कोणत्या मार्गाने जावं हा प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here