जालना,दि.20: लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे उपोषणकर्ते गेल्या 8 दिवसांपासून ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपोषणस्थळी जाऊन हाके यांची भेट घेतली. तसेच वंचितची भूमिका स्पष्ट केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही भेट दिली. हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणाची दखल सरकार घ्यावी अशी ओबीसी समाजाची मागणी आहे.
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघामारे यांचं जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरु आहे. दोन्ही नेत्यांचा उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. या उपोषणाची दखल घेत विजय वडेट्टीवार हे उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी उपोषणस्थळाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांना उपोषणस्थळी सरकारचं शिष्टमंडळ पाठवण्याची विनंती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण उद्या मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ पाठवू, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांना दिलं.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
यावेळी मुख्यमंत्र्यांचा फोन वडेट्टीवारांनी स्पीकरवर ठेवला होता. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान होणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची खबरदारी पहिल्यापासून सरकारने घेतली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे आमचे शब्द आजही कायम आहेत आणि पुढेही कायम राहतील. उपोषणकर्त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी असं त्यांनी सांगितले.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
तर माझं तुमच्याशी बोलणं झाल्याप्रमाणे सरकारकडून २ मंत्री पाठवा, आमच्या ओबीसी बांधवांची जी मागणी आहे ती सगेसोयरे यावरून आहे. त्यावर तुम्ही आश्वासन द्यावं. सगेसोयरेबाबत सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकणार नाही असं तुमचेच मंत्री गिरीश महाजन म्हणालेत, त्यामुळे सरकारकडून लेखी आश्वासन ओबीसींना द्यावे त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
“ओबीसींच्या पाठिमागे उभी राहणं ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीपासून मी तसूभरही मागे जाणार नाही. सत्ता, पद येत असतात आणि जात असतात. त्यामुळे सत्ता आणि पदाचा कधी विचार केला नाही. मी मंत्री असताना सुद्धा, त्या मंत्रीपदाचा विचार न करता समाजाच्या हक्कांसाठी समाजासोबत राहिलेलो आहे. आताच बिहार राज्याच्या हायकोर्टाचा निकाल आला. त्या कोर्टाने सांगितलं आहे की, 62 टक्क्यांपर्यंतच आरक्षण मान्य करता येणार नाही. जे ठरलेलं आहे तेवढंच ठेवता येईल. त्यापुढे मान्य करता येणार नाही”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.