माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केली टीका

0

पुणे,दि.16: शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामिल होत आहेत. शिवसेनेच्या वतीने अनेक पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वदेखील रद्द केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. याआधीच शिवसेनेचे पुण्यातील नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेनेला जबर फटका बसताना दिसत आहे. याला आता विजय शिवतारेंनी “तुम्ही काय हकालपट्टी करणार, मीच शिवसेना सोडलीय” असं म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

“तुम्ही काय माझी हाकलपट्टी करणार. मीच शिवसेना सोडली आहे. 29 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. आम्हाला महाविकास आघाडी मान्य नाही. शिवसेनेने आघाडी तोडावी अशी भूमिका मी मांडली होती” असं शिवतारे यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेत उभी फूट पडण्यास संजय राऊतच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच सर्व काही घडत आहे. त्यांची उद्धव ठाकरेंबाबतची निष्ठा किती आणि शरद पवारांबाबतची निष्ठा किती हे सर्वांना माहीत आहे, असा खोचक टोलाही विजय शिवतारे यांनी लगावला आहे. टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

आम्ही शिवसेनेतच आहोत

विजय शिवतारे यांनी “29 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन मी भूमिका मांडली आहे. त्यात एकच गोष्ट होती. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचं नाही. उद्धव ठाकरेंनी आघाडी तोडावी सर्व काही ठिक होईल. एकनाथ शिंदे यांनी तेच सांगितलं होतं. मी माझी भूमिका स्पष्टच केली होती. माझी काय हकालपट्टी करणार. मीच सेनेतून बाहेर पडलो होतो. हे का करावं लागतंय. हे राजकारण नाही. यामागे मतदारसंघाबाबतचा भविष्यातील विचार आहे. माझ्या मतदारसंघात 2020 पासून एअरपोर्टसह अनेक प्रश्न आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही हे प्रश्न सोडवले गेले नाहीत. काम होत नाहीत. निधी मिळत नाही. त्यामुळे करायचं काय? असा आमदारांसमोर प्रश्न होता. त्यातून हा उद्रेक झाला आहे” असं म्हटलं आहे. 

एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यानंतर शिवतारेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेत शिवसेना नेतृत्वावर टीका केली होती. तसेच एकनाथ शिंदेंची त्यांनी त्यावेळी पाठराखणही केली होती. शिंदे पुण्यात आले असताना त्यांच्या स्वागतासाठी शिवतारे हजर होते.

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात आणि पक्षाची शिस्त मोडल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सामना या वृत्तपत्रातून म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून सतत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्ट्या करण्याचे सत्र शिवसेनेत सुरू आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेतल्याचं यावरून दिसून येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here