पुणे,दि.25: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आज सकाळी 11 वाजता आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे अशी माहिती मिळत आहे.
‘विक्रम गोखले हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत आहेत व हातपाय हलवत आहेत. पुढील 48 तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट निघत असून त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे,’ अशी माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याटगिकर यांनी दिली आहे.
विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वृषाली गोखले यांनी सांगितलं की, ‘विक्रम गोखले यांच्यावर 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत थोडी बरी झाली होती पण पुन्हा त्यांची तब्येत खालावली. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.’ त्यांची तब्येत सुधारावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. आता ते उपचारांना प्रतिसादही देत आहेत.
30 ऑक्टोबरला विक्रम गोखले यांनी त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा केला. विक्रम गोखले यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एबीपी माझाच्या सिंहासन या कार्यक्रमाचे विक्रम गोखले यांनी सूत्रसंचालन केले होते.