सोलापूर,दि.१: Veena Pawar On Solapur Diwali: सोलापूर शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा निर्धार सोलापूर महापालिकेने केला असून याबाबतचा क्रुती आराखडा सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त विणा पवार (Veena Pawar) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. यंदाची दिवाळी स्वच्छ आणि प्रदुषणमुक्त साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. नवरात्रानिमित्त घरोघरी घटस्थापना करण्यात येते आणि दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जित केले जातात.
या घटाचे पावित्र्य राखण्यासाठी महापालिकेतर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील २६ ठिकाणी २७ घट संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत.नागरिकांनी इतरत्र घट न टाकता महापालिकेच्या संकलन केंद्रात विसर्जित करावे, असे आवाहन विणा पवार यांनी केले.
दर मंगळवारी निर्माल्य संकलन करण्यात येणार असून त्यापासून खत निर्मिती केली जाईल. दर शुक्रवारी रस्त्यावरील मलबा उचलून शहर स्वच्छ केले जाईल. दर शनिवारी रस्त्याच्या दुभाजक आणि कडेला आलेले गवत काढून टाकण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. विद्युत डीपी परिसरात आलेले गवत देखील स्वच्छता कर्मचारी साफ करतील. दरम्यान, सोलापूर शहरात ज्या वस्त्यांमध्ये घंटागाडी पोहोचत नाही अशा ठिकाणी महिलांच्या मदतीने घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यात येणार आहे,असेही अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले.
सद्यस्थितीत एकूण १४३ घंटागाड्या कार्यरत आहेत. एकूण २२० घंटागाड्यांची गरज आहे. सोलापूर शहरात एकूण स्वच्छतेसाठी १८३ रूट आहेत. एकूण ९८६ बीट नेमण्यात आले आहेत. नव्या गाड्या उपलब्ध झाल्यानंतर एकूण १८० घंटागाड्याची सोय होणार आहे. यामुळे शहर स्वच्छतेसाठी कोणतीही अडचण येणार नाही.
सोलापूर शहरात महापालिकेचे एकूण २६ वॉर्ड आहेत या सर्व वार्डमध्ये स्वच्छ वार्ड स्पर्धा घेण्यात येणार आहे. याच अंतर्गत सुंदर शाळा, स्वच्छ रुग्णालय यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. “स्वच्छ सोलापूर – सुंदर सोलापूर” राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त पवार यांनी केले आहे.
मंगळवारी निर्माल्य संकलन करणार व दर शुक्रवारी रस्त्यावरील मलबा उचलणार तसेच दर शनिवारी रस्ता दुभाजक आणि रस्त्याच्या कडेला असलेले गवत काढण्याची मोहीम घेणार अशी घोषणा यावेळी पवार यांनी केली.
या पत्रकार परिषदेस सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मनीषा मगर, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल चराटे आदी उपस्थित होते.








