Vaishali Bhaisane: शेतकरी कुटुंबातून आलेली गायिका वैशाली भैसनेच्या हत्येचा रचला जातोय कट?

0

दि.१८: Vaishali Bhaisane: शेतकरी कुटुंबातून आलेली गायिका वैशाली भैसनेच्या हत्येचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती स्वतः वैशाली भैसने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका वैशाली भैसने- माडेने (Vaishali Bhaisane-Mhade) नुकतीच फेसबुकवर पोस्ट करून तिच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. तिच्या अशा घाबरवणाऱ्या पोस्टने सारेच चिंतेत आहेत. तसेच सोशल मीडियावर तिला स्वतःची काळजी घेण्यासही सांगितलं जात आहे. पण अचानक असं काय झालं की वैशालीच्या हत्येचा कट रचला जात आहे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. स्वतः वैशालीने दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन या गोष्टी सांगणार असल्याचं स्पष्ट केलं.

फेसबुक पोस्ट

फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टवर वैशालीने लिहिले की, ‘काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौप्यस्फोट करणार आहे.आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.’

कोण आहे वैशाली माडे?

वैशाली ही शेतकरी कुटुंबातून आली आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमध्ये तिनं पार्श्वगायन केलंय. ‘भारतरत्न’ लता मंगेशकर व आशा भोसले यांची ती जबरदस्त फॅन आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी सिनेमातील ‘पिंगा’ हे तिनं गायलेलं गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. तसंच तिनं ‘कलंक’ या हिंदी सिनेमातील ‘घर मोरे परदेसिया’ हे गाणं गायलंय. मराठी सिनेमातही तिनं अनेक गाणी गायली आहेत.

‘सारेगमप’ या स्पर्धेची विजेती ठरल्यानंतर वैशालीला हिंदी सारेगमप या शोसाठी विचारणा झाली. पण त्यावेळी वैशाली नऊ महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे अशा परिस्थितीत शोमध्ये सहभागी होणे तिला शक्य नव्हते. तिने वाहिनीजवळ एक महिन्याच्या कालावधी मागितला होता. डिलिव्हरी झाल्यानंतर आठ दिवसांतच वैशाली या शोमध्ये सहभागी झाली.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैशालीचे स्वागत केले होते. यावेळी पक्षातील काही ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. वैशालीच्या प्रवेशाचा कार्यक्रम पक्षाच्या मुंबई येथील मुख्यालयात झाला होता. वैशालीला विदर्भाचं विभागीय अध्यक्षपद देण्यात आलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here