Uttarakhand Bus Accident: भीषण दुर्घटना बस दरीत कोसळून 25 भाविक ठार

0

उत्तर काशी,दि.6: Uttarakhand Bus Accident: चारधाम यात्रेतील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. उत्तरकाशीमध्ये भीषण अपघात झाला असून यात 25 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यमुनोत्रीसाठी जाणारी भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळल्यानं ही घटना घडली. यमुनोत्रीच्या डामटा हायवेजवळ ही घटना घडली. या बसमध्ये मध्य प्रदेशातील 30 प्रवासी होते. त्यातील 25 लोकांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

दोन दिवसांपासून बस चालक झोपला नसल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. 25 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई जाहीर केली आहे. उत्तराखंडमधील (Uttarakhand) दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपये दिले जातील, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर जखमींना 50,000 रुपये दिले जातील.

अपघाताचे वृत्त कळल्यानंतर उत्तर काशीचे जिल्हा दंडाधिकारी अभिषेक रुहेला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. तीसपैकी 15 प्रवासी मरण पावल्याची भीती आधी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, अपघातग्रस्त बसमधील 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अपघातस्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) पथके पाठविली असून ही पथके स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या मदतीने बचाव आणि मदतकार्य करीत आहेत. आम्ही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याही सतत संपर्कात आहोत, असे धामी म्हणाले.

दुसरीकडे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबद्दल ट्विट केले आहे, “मी आणि माझी टीम उत्तराखंड सरकार आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत तसेच मृतदेह मध्य प्रदेशात आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. या दु:खाच्या काळात कुटुंबाला एकटे वाटू नये, आम्ही सर्व शोकाकुल कुटुंबासोबत आहोत.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here