मुंबई,दि.५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाल्यापासून ट्रम्प नवनवीन निर्णय घेत आहेत. यात आता आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील काही देशांची चिंता वाढवणारा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 12 देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. तर 7 देशांमधून येणाऱ्या नागरिकांवर अंशत: बंदी घातली आहे.
ट्रम्प यांनी बुधवारी ही घोषणा केली. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेवर चिंता व्यक्त करत डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. यात अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, कांगो, इक्वेटोरियन गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुडान आणि येमेन या देशांचा समावेश आहे. या देशातील नागरिक आता अमेरिकेमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. सोमवार दुपारी 12 वाजून 1 मिनिटांपासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
ट्रम्प यांनी या देशांव्यतिरिक्त, बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या सात इतर देशांमधील लोकांच्या प्रवेशावर अंशतः बंदी आणली आहे. सोमवारी दुपारी 12 वाजल्यापासून प्रवास बंदी लागू होईल.