UP Election 2022: मुस्लिम भगिनी माझे कौतुक करू लागल्या की व्होटबँकेचे काही ठेकेदार अस्वस्थ होतात: नरेंद्र मोदी

0

सहारनपूर,दि.१०: UP Election 2022: उत्तर प्रदेश निवडणुक (Uttar Pradesh Assembly Election 2022) रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) विरोधकांवर जोरदार टीका केली. ‘मुस्लिम भगिनींना आम्ही तीन तलाक प्रथेच्या छळातून मुक्त केले. तीन तलाक कायदा बनवत त्यांना सुरक्षिततेचा विश्वास दिला. अशावेळी मुस्लिम भगिनी माझे कौतुक करू लागल्या की व्होटबँकेचे काही ठेकेदार अस्वस्थ होतात. त्यांच्या पोटात दुखू लागते’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होटबँकेचे राजकारण करणाऱ्या पक्षांना फटकारले.

उत्तर प्रदेशात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे मोदींची पहिली जाहीर प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तीन तलाक कायद्याचा उल्लेख करत मुस्लिम मतांचे राजकारण करणाऱ्या पक्षांना खडेबोल सुनावले. मुस्लिम माता-भगिनी आणि लेकींना त्यांचे हक्क मिळू नयेत म्हणून अनेक मार्गांनी अडथळे आणले जात आहेत. मात्र, या प्रवृत्तीला आम्ही थारा दिलेला नाही. मुस्लिम महिलांच्या हिताचा निर्णय आम्ही घेतला. उत्तर प्रदेशातील मुस्लिम भगिनींनाही माझे आवाहन आहे. तुम्हाला सुरक्षित वातावरण हवं असेल. जाचातून मुक्ती हवी असेल तर येथे योगी सरकार आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाजवादी पक्षावर जोरदार प्रहार केला. घराणेशाहीवर चालणारा हा पक्ष आज सत्तेत असता तर कोविडवरील लस रस्त्यावर विकली गेली असती. लोकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचे काम त्यांनी केले असते, असे मोदी म्हणाले. मुझफ्फरनगर आणि सहारनपूर येथील दंगलींचा उल्लेख करताना समाजवादी पक्षाला दंगलखोर अशी उपमा त्यांनी दिली. सपाच्या निवडणूक जाहीरनाम्यावरही मोदींनी निशाणा साधला. खोट्या आश्वासनांचा नुसता वर्षाव सुरू आहे. कधीही पूर्ण केली जाऊ शकणार नाहीत अशी आश्वासने दिली जात आहेत. मात्र, उत्तर प्रदेशातील सुजाण जनता यांना चांगलंच ओळखून आहे. जनतेने यांना आधीच नाकारले आहे. त्यांच्या नशीबात आता सत्ता नाही, असा टोला मोदींनी हाणला. योगी सरकारने कोरोनाकाळात केलेल्या कामांचा दाखलाही यावेळी मोदींनी दिला व उत्तर प्रदेशच्या विकासासाठी, भयमुक्त वातावरणासाठी, दंगलमुक्त राज्यासाठी भाजप सरकार आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here