दि.२५: आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शाहरुख खानला मोलाचा सल्ला दिला आहे. तसेच आठवले यांनी क्रूझ शिपवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या कामाचं कौतुक केले आहे. क्रूझ शिप पार्टी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) तीन आठवड्यांपूर्वी अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केली. आर्यन खानला जामीन मिळत नसल्यानं त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
आर्यन खानला पुनर्वसन केंद्रात पाठवण्याचा सल्ला आठवलेंनी शाहरुखला दिला आहे. ‘तरुण अवस्थेत अंमली पदार्थांचं सेवन करणं चांगलं नाही. अद्याप आर्यनपुढे पूर्ण भविष्य पडलंय. शाहरुखनं आर्यनला मंत्रालयाशी संबंधित पुनर्वसन केंद्रात पाठवावं,’ असं आठवले म्हणाले. ‘आर्यनला तुरुंगाऐवजी १ ते २ महिने पुनर्वसन केंद्रात ठेवायला हवं. देशात अनेक पुनर्वसन केंद्रं आहेत. तिथे एक ते दोन महिने राहिल्यास आर्यनची अंमली पदार्थांचं व्यसन सुटेल’, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.
क्रूझ शिपवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या कामाचं रामदास आठवलेंनी कौतुक केलं. ‘आर्यन खानकडून किमान ५ ते ६ वेळा जामिनासाठी अर्ज करण्यात आला. मात्र तो फेटाळला गेला. एनसीबीकडे पूर्ण ताकद असल्याचं यावरून समजतं. आर्यनची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणणं चुकीचं ठरेल’, असं आठवले म्हणाले.