केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज ठाकरेंची घेतली भेट, दोन तास चर्चा

0

मुंबई,दि.४: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज ठाकरेंची घेतली भेट घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यामध्ये महाविकास आघाडी सरकारवर सडकून टिका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) राज ठाकरेंची भेट घेतलीय. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास गडकरी हे राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले. राज यांनी शिवसेना, राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर या भेटीत पुन्हा एकदा भाजपा-मनसे युतीबद्दल चर्चा झाल्याची बातमी राजकीय वर्तुळामध्ये फिरु लागली. मात्र यावर गडकरी यांनी राज ठाकरेंच्या घरातून निघताना खुलासा केला.

राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली. मात्र ही भेट व्यक्तीगत होती असं गडकरींनी राज यांच्या घराबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. राजकीय हेतूने आपण राज ठाकरेंची भेट घेतलेली नव्हतं असं गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितलं.

“माझी ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि त्यांचे नवं घरंही पहायला त्यांनी मला बोलावलं होतं,” म्हणून आपण आलेलो असं गडकरींनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. पण आगामी सर्व निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार असून मनसेशी युती करणार नाही, असे भाजपाने जाहीर केल्याने गडकरी-ठाकरे भेटीतून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे भाजपा नेत्यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here