मुंबई,दि.७: Udhayanidhi Stalin: सनातन धर्माची डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांशी तुलना करणारे तमिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आपल्या जुन्या वक्तव्याचं, भूमिकेचं समर्थन करण्यासाठी आणि आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत हे सांगण्यासाठी त्यांनी सनातन धर्माबाबत टिप्पणी केली आहे.
दुसऱ्या बाजूला मद्रास उच्च न्यायालयाने सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन आणि पी. के. शेखर बाबू यांच्याविरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, कोणत्याही व्यक्तीला फुटीरतावादी विचारांना चालना देण्याचा किंवा कोणत्याही विचारधारेचा नायनाट करण्याचा अधिकार नाही.
दरम्यान, आपल्या जुन्या वक्तव्याचं समर्थन करण्यासाठी उदयनिधी म्हणाले, मी काहीच चुकीचं बोललो नाही. मी माझ्या वक्तव्याप्रकरणी कायदेशीर कारवाईला सामोरा जाण्यासाठी तयार आहे. कारवाईच्या भितीने मी माझं वक्तव्य बदलणार नाही. मी माझी विचारधारा मांडली आहे. आंबेडकर, पेरियार आणि थिरुमावलवन यांनी जे म्हटलं होतं तेच मी म्हटलं आहे. त्यापेक्षा जास्त काहीच बोललो नाही. मी आज आमदार, मंत्री आणि पक्षाच्या युवा शाखेचा सचिव असू शकतो, उद्या कदाचित मी यापैकी कुठल्याच पदावर नसेन. परंतु, आपण माणूस असणं गरजेचं आहे.
दुसऱ्या बाजूला मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी. जयचंद्रन यांनी उदयनिधींच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. जयचंद्रन म्हणाले, सत्तेत बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने वागलं पाहिजे. त्यांनी अशा प्रकारच्या विचारांचा प्रसार करू नये. जी विचारधारा जात आणि धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये दरी निर्माण करते, ती विचारधारा सार्वजनिकरित्या मांडण्याऐवजी ते (उदयनिधी) राज्यातील अंमली पदार्थांच्या समस्येचे उच्चाटन करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात.
मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, “आम्ही अनेक वर्षांपासून सनातन धर्माविषयी बोलत आहोत. सनातन धर्म हा अनेक वर्षांपासूनचा मुद्दा आहे. आम्ही नेहमीच त्याचा विरोध करू.” उदयनिधी हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांचे पूत्र आहेत.