मुंबई,दि.21: माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला प्रेरणा गीतातील भवानी शब्द हटवण्यास नकार दिला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) प्रेरणा गीतात ‘भवानी’ शब्द आला आहे, यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला तो शब्द हटवण्याचे निर्देश दिले. ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाचे नोटीस उध्दव ठाकरे यांनी धुडकावली आहे.
उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्या व्हिडीचा पुरावा देत निवडणूक आयोगाला सवाल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडून उघड-उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरू आहे, असं सांगत ठाकरेंनी शाह आणि मोदींचा व्हिडीओ दाखवला. निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाह यांच्यावर कारवाई का नाही, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला.
अटलजी पंतप्रधान असताना निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क 6 वर्षासाठी काढून घेतला होता. हिंदू धर्माचा प्रचार केल्याचा ठपका त्यांच्यावर होता. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचारातील भाषणात ‘बजरंग बली की जय बोलून बटण दाबा’ असं सांगतायत. अमित शाह ‘बजरंग बलीचं दर्शन देतो’ असे म्हणतात. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाचा नियम बदललाय का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
आमचं पुर्वीचं गीत जनता उत्साहाने गाते. आम्ही मशाल चिन्ह मिळाल्यानंतर प्रेरणा गीत आणलं. त्यातील हिंदु हा तुझा धर्म, जाणून घे मर्म..यातील हिंदू हा शब्द निवडणूक आयोगाने काढायला लावला आहे. आम्ही हिंदु धर्माच्या आधारे मत मागितलं नाही. चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यायला हवे. या गाण्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जय भवानी, जय शिवाजी घोषणा आहे. यातील जय भवानी हा शब्द काढावा असे आयोगाने म्हटले आहे. तसेच हिंदु हा तुझा धर्म या शब्दावरही निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलाय.
“गेल्या काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश, तेलंगणा या निवडणुकीवेळी आम्ही निवडणूक आयोगाला एका व्हिडीओची विचारणा केली होती. या व्हिडीओत आमचं सरकार आणल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु, असं अमित शाह म्हणाले. बजरंग बलीचं नाव घेत पंतप्रधान मोदींनी प्रचार केला. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाहांवर आधी कारवाई करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
सर्वात आधी मोदी-शहांवर कारवाई करा. महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल द्वेश जनता खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढला जाणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.