औरंगाबाद, दि.८: आज औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा होणार आहे. सभेसाठी शिवसेनेने पूर्ण तयारी केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असताना दुसरीकडे भाजपा नेते मात्र यावरुन टोलेबाजी करत आहेत. यादरम्यान औरंगाबादमधील शिवसेना नगरसेवकाने केलेली जाहिरातबाजी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही असं सांगत नगरसेवकाने भाजपावर जोरदार टीका केली आहे.
काय म्हटलं आहे?
शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी ही जाहिरात दिली असून औरंगाबादमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. “ईडी, आर्थिक कोंडी आणि बदनामी करुन उद्धव ठाकरे सरकारला घेरलं तर गाठ शिवशक्ती-भीमशक्तिशी आहे,” असा इशारा चेतन कांबळे यांनी जाहिरातीतून गिली आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करोना परिस्थिती प्रभावीपणे हाताळली याची दखल जागतिक पातळीवर अमेरिकन, युरोपियन संस्था, मीडियाने घेतली. उत्तर प्रदेशप्रमाणे गंगाकिनारी लाखो प्रेतं बेवारस दफन केले नाहीत. थाळ्या, टाळ्या वाजवून नाकर्तेपणा केला नाही,” असा टोला चेतन कांबळे यांनी लागवला आहे.

उद्धव ठाकरेंवर प्रतिगाम्यांचा राग का? अशी विचारणा करताना चेतन कांबळे यांनी आमचे हिंदुत्व बहुजनांचे आहे. दीड टक्क्यांचे नाही, शेंडी-जानव्याचे नाही असंही म्हटलं आहे.