मुंबई,दि.15: उध्दव ठाकरेंनी भाजपा आणि मनसेला तर शरद पवारांनी अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. बारामती लोकसभा मतदार संघात नणंद भावजय यांच्यात सामना होणार आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी आपली सगळी राजकीय शक्ती पणाला लावली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिशी भाजपा आणि शिवसेनेची (शिंदे गट) ताकत आहे. यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांना सोबत घेत शरद पवारांना धक्का दिला होता. आता पवारांकडूनही या धक्क्याची परतफेड करण्यात येणार असून इंदापुरातील महायुतीचे दोन नेते आपल्या पक्षात आणण्यात त्यांना यश आलं आहे.
पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भरत शाह हे उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
उध्दव ठाकरेंचा भाजपा आणि मनसेला धक्का
शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मनसेला मोठा झटका दिला आहे पनवेलमध्ये भाजपच्या 4 माजी नगरसेवकांनी आणि मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.
उध्दव ठाकरे म्हणाले, “निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे केंद्र सरकार बदलण्याच्या जिद्दीने मावळे येत आहेत. संख्या वाढत आहे. या सर्वांचं स्वागत आहे. ही टीम आली. ती पनवेलमधील आहे. संजोग वाघेरे यांच्या मावळ मतदारसंघातील आहे. यांचा प्रवेश होत असताना काही गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामे जाहीर करतात. अशक्यप्राय गोष्टी आम्ही करू सांगत असतात. ते सांगतात मूळचे प्रश्न दूर राहतात. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत, त्या त्यांच्या एकट्याच्या नाहीत. तिथले जे काही प्रश्न आहेत. त्यावर आंदोलन झाले आहेत. अजूनही सुरू आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.