Shivsena: उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार, शिवसेनेचे आमदार आणि खासदार शिंदे गटात प्रवेश करणार?

0

दि.३: शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेचे ४० आमदार व १२ खासदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) यांच्याबरोबर गेले आहेत. राज्यात शिवसेना कोणाची यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेवर व धनुष्यबाण चिन्हावर एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे. शिवसेनेतील अंतर्गत वादावर न्यायालयीन लढाई सुरू आहे.

शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षातील पडझड थांबवण्यासाठी युवा सेना नेते आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शक्तिप्रदर्शनाची चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेनेतील आणखी काही खासदार आणि आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा दावा एका खासदाराने केला आहे. 

एकनाथ शिंदे गटातील बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी याबाबत दावा केल्याचे सांगितले जात आहे. बुलढाण्यातील दोन आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेमध्ये उरलेल्या आमदारांपैकी चार आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून तीन खासदार लवकरच शिंदे गटामध्ये सामील होणार असल्याचा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे. १८ पैकी १२ खासदार शिंदे गटात आले आहेत. इतर काही खासदार तुमच्या संपर्कात आहेत का, या प्रश्नावर उत्तर देताना, शंभर टक्के, असे प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. 

काही खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडे असलेल्या १५ आमदारांपैकी काही आमदार वेगवेगळ्या लोकांच्या तसेच एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. याचे उदाहरण सांगायचं झाल्यास, उद्धव ठाकरेंनी गटनेत्यांचा मेळावा घेतला त्यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवरुन लक्षात आले असेल. त्यांनी हेच म्हटले होते की, शिवसेना-भाजपाचीच युती असली पाहिजे कारण ही नैसर्गिक युती आहे, असे जाधव म्हणाले. 

दरम्यान, ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतील, तेव्हा त्यातील तीन ते चार खासदार आमच्याकडे येतील. निवडणूक आयोग काय निर्णय देणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. धनुष्यबाण आम्हाला १०० टक्के मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आमचा दावा तितका मजबूत आहे. तितके पुरावे आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत. धनुष्यबाण आमच्याकडे आला तर तिकडे काहीच शिल्लक राहणार नाही एवढी गोष्ट नक्की आहे, असा मोठा दावा जाधव यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here