‘भाजपाला आधी गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं…’ उद्धव ठाकरे

0

खेड,दि.६: काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय देत शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यानंतर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खेडमध्ये पहिलीच सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगालाही चुना लगाव आयोग असे म्हटले. 

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा आयोगाने निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्रिय निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. “शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. तसेच भाजपाला आधी गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, असं म्हणत खोचक टोला लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मला निवडणूक आयोगाला खास सांगायचं आहे की, त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल, तर कोणती शिवसेना खरी आहे हे पाहायला इकडं या. हा ‘चुना लगाव आयोग’ आहे. ते सत्येचे गुलाम आहेत. वरून जे आदेश येतात त्याप्रमाणे वागणारे हे त्यांचे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत, हे मी उघडपणे बोलतो आहे.”

शिवसेनेची स्थापना आयोगाच्या वडिलांनी नाही…

“कारण निवडणूक आयोगाने या तत्वानुसार शिवसेना शिंदे गटाची असल्याचं सांगितलं ते तत्वच खोटं आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे. कदाचित तिकडं वरती निवडणूक आयोगाचे वडील बसले असतील. मात्र, ते आयोगाचे वडील असतील, माझे नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.

भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “शिवसेना फोडणारे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या एकजुटतेवर घाव घालत आहेत. हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुखांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. त्या हिंदुत्वाला धुमारे फुटत असताना शिवसेना फोडण्यात आली. यांना कोण विचारत होतं, भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं.”

“तेव्हा शिवसेनाप्रमुख यांच्यामागे उभे राहिले नसते, तर हे आज दिसले नसते. मात्र, हे निष्ठुर आणि निर्घृणपणे वागत आहेत. ज्यांनी साथ दिली त्यांनाच संपवत आहेत. त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करून पाहावा,” असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ‘बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे. आम्हाला देशद्रोही म्हटला असता तर जीभ हसडून टाकू, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते खेड येथे जाहीर सभेत बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “काल परवा मिंधे बोलले, बरं झालं आमचं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं. त्यांच्या विधानानंतर सगळ्यांनी धुडगूस घातला. मग ते म्हणाले, नाही… नाही… नाही… मी तुम्हाला उद्देशून देशद्रोही बोललो नाही. अरे पण तुम्ही आम्हाला देशद्रोही बोलूच कसं शकता, बोलला असता तर जीभ हसडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत. आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंधेंना बोलतोय.” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

“राजन साळवी, अनिल परब हे काय देशद्रोही आहेत का? १९९२-९३ ला जेव्हा मुंबईत सगळं पेटलं होतं. त्यावेळी अनिल परबांसारखे सगळे शिवसैनिक तिकडे होते. ते शिवसैनिक आज तुम्हाला देशद्रोही वाटत आहेत का?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here