Uddhav Thackeray: भाजपा विरूध्द शिवसेना आक्रमक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा या नेत्याला फोन

0

मुंबई,दि.१६: Uddhav Thackeray: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रीय तपास यंत्रणेचा भाजपा दुरुपयोग करत आहे असा शिवसेनाचा दावा केला आहे. सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांची भेट घेणार आहेत. या भेटीचा मुहूर्त आता निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के. चंद्रशेखर राव ( K Chandrashekhar Rao) यांना फोन केला होता. फोनवर झालेल्या चर्चेवेळी उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांना २० फेब्रुवारीला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले आहे.

ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांकडून माझ्या कुटुंबीयांना आणि निकटवर्तीयांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकताच केला होता. एवढेच नव्हे तर संजय राऊत यांनी ईडी आणि भाजप नेत्यांमधील कथित हितसंबंधही उघड केले होते. संजय राऊत यांच्या वादळी पत्रकारपरिषदेच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांना फोन लावल्याने अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. केसीआर हे लवकरच मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारणार आहेत. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहे. मोदी सरकारच्या व्यक्तीविरोधी धोरणांचा विरोध आणि देशाच्या संघराज्य पद्धतीच्या संरक्षणासाठी केसीआर हे केंद्राविरोधात आंदोलन करणार आहेत. फोनवरील चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.



गेल्या काही दिवसांमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्याकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. भाजपविरोधात देश पातळीवर आघाडी उघडण्यासाठी अधिक वेगाने काम करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर केसीआर यांनी आपण लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आम्ही गेल्या महिनाभरापासून काम करत आहोत आणि २०२४ च्या निवडणुका एकत्र लढण्यासाठी सर्व विरोधकांची स्वतंत्र आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले होते.

के. चंद्रशेखर राव यांनी भाजपबद्दल काय म्हटले होते?

केंद्रातील भाजपचे वर्तमान सरकार हे पूर्वीच्या काँग्रेस सरकार प्रमाणेच वागत आहे. भाजप सरकार राज्यांच्या अधिकारांवर गदा आणत आहे. देशासाठी एक नवीन राज्यघटना, नवीन राजकीय शक्ती आणि नवीन शासनाची संकल्पना, मुख्यमंत्री केसीआर राव यांनी मांडली.भाजपला मुळापासून उपटून फेकायचं आहे. भाजपने देशाला दारिद्यात ढकललं आहे. देशाला गुणात्मक आणि क्रांतिकारी बदलांची गरज आहे. या क्रांतीसाठी शस्त्र उचलण्याची गरज नाही. संसदीय पद्धतींद्वारे ते घडवून आणले जाऊ शकते, असे मुख्यमंत्री केसीआर म्हणाले. कुठलाही मुद्दा असला तर देशभरातून आवाज उठून प्रतिक्रिया उमटली पाहिजे. देशाच्या भवितव्यासाठी आताच उठवण्याची ही वेळ आहे. जयप्रकार नारायण यांनी पुकारलेल्या चळवळीप्रमाणे देशात एक चळवळ उभी केली पाहिजे. याच चळवळीतून भाजपचा उदय झाला आहे, असे केसीआर बोलले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here