आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, आम्ही गध्याला सोडून दिलं; उध्दव ठाकरे

0

मुंबई,दि.१४ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सभेची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारे जाहीर सभा घेत असल्यामुळे या सभेत ते काय बोलणार? याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे. जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो.. तुमच्याप्रमाणे मलाही मोकळं वाटतंय जरा. बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलोय. अनेक विषयांवर बोलायचंय. असे म्हणत उध्दव ठाकरेंनी भाषणाला सुरूवात केली.

ज्यांना महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र म्हणजे काय हे ओळखता आलं नाही, त्यांच्यासाठी मध्ये मध्ये बोलावं लागतं. गाढवानं लाथ मारण्याआधीच आम्ही त्यांना सोडलं असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

उध्दव ठाकरे म्हणाले, हल्ली खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, ते देशाची दिशा भरकटवत आहेत. मी मध्ये बोललो होतो की आमचं हिंदुत्व शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे. ते म्हणाले मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. तोच धागा घेऊन पुढे जातोय. आपलं हिंदुत्व गदाधारी आहे, इतरांचं घंटाधारी आहे. बसा बडवत घंटा. काय मिळालं, घंटा.

आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आम्ही गध्याला सोडून दिलं. कारण काही उपयोग नाही त्याचा. जी गाढवं आमच्यासोबत घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत होती, त्या गाढवानं आम्हाला लाथ मारायच्या आधीच आम्ही त्याला लाथ मारली. बसा बोंबलत असे म्हणत उध्दव ठाकरेंनी भाजपावर टीका केली.

इथे बसलेल्या हिंदुंमध्ये शिवसेना प्रमुखांनी जे रक्त पेरलं आहे, हा हिंदू मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. कुणाची बिशाद आहे बघतो ना हिंदुत्वावर घाला घालण्याची.

पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, ज्या जागेवर आपली सभा होतेय, इथे ते बुलेट ट्रेन आणत आहेत. आपण मागितली का बुलेट ट्रेन? झाली उद्या बुलेट ट्रेन, तरी आपल्यापैकी किती लोक जाणार तिकडे. हा मुंबई तोडण्याचा डाव चाललाय. मुंबई स्वतंत्र करणार म्हणजे काय? देश पारतंत्र्यात आहे का? मला फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात संघ होता. पण एकदाही संघ स्वातंत्र्यलढ्यात उतरलेला नाही. असेल तर दाखले दाखवा.

तेव्हा तुम्ही नव्हतात. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही जनसंघ म्हणून होतात. तेव्हा शिवसेना नव्हती. पण बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंना मदत करत होते. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. मतभेद मिटवण्याचं आवाहन त्यांनी केलं. पण त्यातून पहिला फुटला जनसंघ. म्हणजे यांचे पूर्वीचे बाप. जागावाटपावरून भांडण करून फुटले.

काँग्रेसच्या काळात ७ पैशांनी पेट्रोलचे दर वाढल्यामुळे भाजपानं संसदेवर मोर्चा काढला होता. त्यात अटल बिहारी वाजपेयी बैलगाडीने गेले होते. भाजपाचा तो संवेदनशीलपणा कुठे गेला? ही जर बाळासाहेबांची शिवसेना नसेल, तर तुमचा भाजपातरी अटलजींचा राहिलाय का? – उद्धव ठाकरे

गेल्या वेळी त्यांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या. भगव्या टोप्या कशाला? हिंदुत्व डोक्यात असतं. डोक्यातल्या मेंदूत असतं. टोपीवर हिंदुत्व नसतं. भगवी टोपी घालून तुम्ही हिंदुत्व दाखवत असाल, तर आरएसएसची टोपी काळी का?

शरद पवारांवर एका बाईने विचित्र कॉमेंट केली. घरी आई-वडील कुणी आहे का? संस्कार काही होतात की नाही? काहीही झालं, तरी बाई तुझा संबंध काय? कुणाबद्दल बोलतेयस. काय बोलतेयस. जर हे तुझं वक्तव्य असेल, तर तुझी मुलं उद्या काय होणार? हा सुसंस्कृतपणा आपल्या महाराष्ट्रातून, देशातून जात चाललाय.

तुम्ही केलं तर पवित्र आणि आम्ही केलं तर अपवित्र

काँग्रेससोबतर असलो, तरी ह्रदयातलं हिंदुत्व सोडलेलं नाही. मी विधानसभेत बोललोय. सत्ता असो वा नसो, परवा नाही. आमचं हिंदुत्व तकलादू नाही, ते खरं आहे. हिंदुत्व सोडायला काय धोतर वाटलं का, कधी नेसलं, कधी सोडलं. सोडायला लाज तुम्हाला नसेल वाटत, पण हिंदुत्व नेसण्याची, सोडण्याची गोष्ट नाही. आम्ही काँग्रेससोबत गेलो ते उघड गेलो. तुमच्यासारखं सकाळचा शपथविधी नाही केला आम्ही. तुम्ही केलं तर पवित्र आणि आम्ही केलं तर अपवित्र. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर दगा, तुम्ही सकाळची शपथ घेतली ते काय केलं. तो तुमचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून गुणगान केलं असतं असं वाटतं का तुम्हाला? – उद्धव ठाकरे

आमचं हिंदुत्व घर पेटवणारं नाही, घरातली चूल पेटवणारं

तुम्ही खोट्या मार्गाने आमच्या मागे लागाल, तर हा महाराष्ट्र असा पेटेल, की पळता भुई थोडी होईल. ही षंढाची औलाद जर तुम्ही आमच्या मागे एजन्सी आमच्या मागे लावणार असाल आणि त्यांच्या पाठून तुम्ही शिखंडी म्हणून बोलणार असाल, तर महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. तुम्हाला दयामाया दाखवणार नाही. लढायचं असेल, तर सरळ या. आम्ही आहोत, तुम्ही आहात. ही जनता सगळं ठरवेल. पण आता हे राजकारण बंद करा. आमचं हिंदुत्व घर पेटवणारं नाही, घरातली चूल पेटवणारं असायला हवं. – उद्धव ठाकरे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here