काळ नेहमी बदलत असतो, पण दिवस फिरतात, दिवस फिरले तर तुमचं काय होईल: उद्धव ठाकरे

0

मुंबई,दि.1: संजय राऊत यांच्याबद्दल मला निश्चित अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या अटकेसह, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली.

भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बिहारमधील भाषणातून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्यांना ज्यापद्धतीनं त्यांचा पक्ष वाढवायचा आहे यातून यांना फक्त बळाचा वापर करायचा आहे असं दिसून येत आहे. देशात अतिशय घृणास्पद राजकारण भाजपाकडून सुरू आहे. याकडे जनतेनं आता डोळे उघडून बघण्याची वेळ आली आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काल बिहारच्या पाटणामध्ये केलेल्या भाषणातील मुद्दे मांडून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. “देशात आता प्रादेशिक पक्ष शिल्लक राहिलेले नाहीत असं जेपी नड्डा बोलले यातूनच त्यांना देशात काय करायचं आहे हे लक्षात येतं. देशात भाजपा हा एकमेव पक्ष राहणार आहे असं ते म्हणाले हे विधान अत्यंत गंभीर आहे. त्यांच्या विधानात लोकशाही कुठे आहे का? राजकारण एक बुद्धीबळ असल्याचं आपण म्हणतो. पण यांच्याकडून फक्त बळाचा वापर केला जात आहे. बुद्धीचा वापर आता केला जात नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दिवस फिरले तर तुमचं काय होईल याचा विचार जेपी नड्डा यांनी करावा”, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. 

जेपी नड्डा यांनी देशातील सर्व पक्षात वंशवाद सुरू असल्याचं म्हटलं. पण त्यासोबतच विविध पक्षात बरीच वर्ष काम केलेले लोक आज भाजपामध्ये येत आहेत असंही ते म्हणाले. मग भाजपाचा वंश नेमका कुठून सुरू झाला? हे त्यांनी ठरवावं. भाजपाकडून सुरू असलेलं राजकारण घृणास्पद स्वरुपाचं आहे. बळाचा वापर करुन प्रादेशिक पक्षातील नेत्यांना फोडायचं आणि गुलामासारखं वागवायचं. सगळे पक्ष संपतील किंवा आम्ही संपवू असा जेपी नड्डा यांच्या भाषणाचा कंसातील अर्थ आहे. त्यामुळे लोकांनी आता वेळ जाण्याच्या आधी विचार करण्याची वेळ आली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काळ नेहमी बदलत असतो. तुमच्याकडे आज बळ आहे, पण दिवस फिरतात,” असंही उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here