उद्धव ठाकरे यांनी खरे हिंदुत्व जपले: मराठी मुस्लीम सेवा संघ

0

मुंबई,दि.22: द्वेष पसरवणारे हिंदुत्व शिकवू लागले आहेत, पण उद्धव ठाकरे यांनी खरे हिंदुत्व जपले अशा भावना मराठी मुस्लीम सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार गेले आहेत. त्यानंतर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अनेकांनी समर्थन दिले आहे.

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्हही गोठविण्यात आलं आहे. त्यामुळे, पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नव्याने शंख फुंकला आहे. उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत असून अनेक लहानमोठ्या पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. आता, मराठी मुस्लीम सेवा संघाच्या सदस्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. 

अंधेरी पोटनिवडणुकीवेळी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप या पक्षांनी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. तर, शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी राठोड यांच्या मतदार संघातील माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांचा दोन दिवसांपूर्वीच मातोश्रीवर शिवबंधन बांधून पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे, शिवसेना पक्षाला पाठिंबा वाढत आहे. आता, मराठी मुस्लिम सेवा संघाच्या सदस्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेस आपला पाठींबा जाहीर केला आहे. त्यानंतर, बोलताना उद्धव ठाकरेंनी संघाचे आभार मानले. 

देशभक्त मुस्लिम बांधव नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिले आहेत. तुम्ही बंधुत्वाच्या नात्याने आलात, पाठिंबा दर्शवलात त्याबद्दल आभार. आपण मराठी आहोत… एकत्र काम करू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मुंबई, मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या मराठी मुस्लिम सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मराठी मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्राची अस्मिता, एकता आणि अखंडतेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

उद्धव ठाकरेंनी खरं हिंदुत्त्व जपले

मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष फरीर मोहम्मद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली यावेळी संघाच्या वतीने उद्धव ठाकरे यांना एक पत्र देण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तत्त्वे आणि मूल्यांवर शिवसेना पक्षाची स्थापना केली. आज देशामध्ये जातीधर्माचे राजकारण करून द्वेष पसरवणारे याच शिवसेनेला हिंदुत्व शिकवू लागले आहेत, पण उद्धव ठाकरे यांनी खरे हिंदुत्व जपले आहे, अशा भावना यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here