मुंबई,दि.1: Uddhav Thackeray PC: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेतली. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शिवसैनिक व जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्यावर टीका केली.
माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आरेच्या निर्णयावरुन मला दु:ख झाले असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. मुंबईकरांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो. आरेत कारशेड उभारु नका असेही ठाकरे यावेळी म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे महाविकास आघाडीचं सरकार आलेच नसते असेही ठाकरे म्हणाले.
हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही
आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला. अमित शाह आणि माझं जे ठरलं होत ते झालं असते तर महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. सगळं सन्मानानं झाले असते. पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा किंवा भाजपचा झाला असता असेही ठाकरे यावेळी म्हणाले. जे भाजपसोबत आज गेले, त्यांनी भाजपला प्रश्न विचारायला हवा असेही ते म्हणाले.
सत्ता येते-जाते परत येते, परंतु लोकांच्या अश्रूची प्रतारणा केली नाही. विचित्रपणाने शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्रिपदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होणं हे जनतेला आवडेल न आवडेल माहिती नाही परंतु हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. तो धृतराष्ट्रासारखा नाही. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
लोकशाहीचे चार स्तंभ असतात, या चारही स्तंभाने लोकशाही वाचवायला पुढे यायला पाहिजे. लोकशाही उरली नाही तर या स्तंभाला काहीही अर्थ राहणार नाही. आपल्याकडे गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे. ज्याने मतदान केले त्याला कळायला हवं कुणाला मतदान हवं. आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केली. निवडून आलेल्या प्रतिनिधीला बोलावण्याचा अधिकार हवा असं बाळासाहेब म्हणाले होते. माहिमच्या मतदाराने टाकलेले मत व्हाया सूरत, व्हाया गुवाहाटी गोवा फिरत असेल तर लोकशाही आहे कुठे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.