मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू होता: उद्धव ठाकरे

0

दि.26: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित केला आहे. महाराष्ट्रातील विश्वासघातकी सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुफानी मुलाखत ‘सामना’ला दिली. महाराष्ट्र नव्हे, तर देश ज्या मुलाखतीची सर्वाधिक प्रतीक्षा करीत होता त्या सनसनाटी मुलाखतीचा प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रातील सरकार का पाडले, कसे पाडले इथपासून शिवसेनेच्या भवितव्यापर्यंतच्या प्रत्येक प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी खणखणीत उत्तरे दिली. उद्धव ठाकरे यांनी अनेक रहस्यांवरचा पडदा उठवला. विश्वासघात झाल्याची वेदना त्यांच्या मनात आहे, पण त्यांनी अत्यंत अस्वस्थ मनाने सांगितले, ‘‘सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी इस्पितळात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले!’’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत जशीच्या तशी

उद्धवजी, जय महाराष्ट्र!
– जय महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या तमाम मराठी, हिंदू जनतेला माझा जय महाराष्ट्र!

उद्धवजी, बाहेर इतकं वादळ माजलंय तरीही तुम्ही इतके ‘रिलॅक्स’ दिसताय? काय रहस्य आहे?
– (हसून) हे रहस्य फार गुंतागुंतीचं नाहीय. तुम्ही जाणता, माझी माँ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आलेलं हे रसायन आहे. माँ म्हटल्यानंतर शांत, सौम्य, संयम आणि साहजिकच आहे, बाळासाहेब म्हटलं तर वर्णन करण्याची आवश्यकताच नाही. बाळासाहेब काय होते हे महाराष्ट्रच नव्हे तर अवघा देश जाणतो. थोडंफार ते रसायन आलंय माझ्यात.

आपण वर्षभरानं सविस्तर बोलतोय… बरोबर?
– मला आठवतंय, गेल्या वर्षी जेव्हा आपण माझी मुलाखत घेतली होती तेव्हा कोरोनाचा कहर होता. त्या कोरोनामध्ये जे काही करता येणं शक्य होतं ते मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि अभिमानाने सांगेन की, माझ्या राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून मी केलं. त्यावेळी लॉकडाऊन होतं… मंदिरे बंद होती… सणासुदींना बंदी होती. पण या वर्षी आपण पहिल्यांदाच पंढरपूरच्या वारीत कोणतेही अडथळे येऊ दिले नाहीत आणि जल्लोषात ती पार पाडली. म्हणजेच पुन्हा एकदा सणासुदीला सुरुवात झाली आहे. आता दहीहंडी येईल, गणपती येतील, नवरात्र येईल, दिवाळी येईल. पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात उत्सव, उत्साह आणि आनंद याची सुरुवात झाली आहे. मध्यंतरी जणुकाही एक ‘पॉज’ बटण दाबलं गेलं होतं. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण कोरोनातून आणि त्या संकटातून बाहेर पडलो. मला आनंद आहे.

होय नक्कीच. पण तुमच्यावर राजकीय संकट घोंघावताना दिसतंय… वादळ आहे…
– आपण मुलाखतीच्या सुरुवातीला म्हटलंत की, एक वादळ आल्याचा आभास होतोय. तुम्ही लक्षात घ्या, वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर नक्कीच येणार आहे.

पण तुम्ही एकदम शांत दिसताय…
– मी शांत कसा? खरं सांगायचं तर मला चिंता नाहीये. चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकूल नाहीये. मात्र थोडीफार चिंता आहे ती नक्कीच मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे. याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंटय़ांच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे. म्हणून मी जे म्हटलं की, हा पालापाचोळा सध्या उडतोय… तो उडू द्या. इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात.

म्हणजे नवी पालवी फुटेल…
– मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटलं होतं की, ज्या वेळी मी ‘वर्षा’त राहात होतो तेव्हाचा अनुभव कथन केला होता. या घराच्या आवारातच दोन झाडं आहेत. एक आहे गुलमोहराचं आणि दुसरं आहे बदामाचं. दोन्ही झाडं मी साधारणतः गेली दोन-एक वर्षे बघतोय. ज्याला आपण पतझड म्हणतो… पानगळ… त्यात पानं पूर्ण गळून पडतात. फक्त काडय़ा राहतात. आपल्याला वाटतं, अरे या झाडाला काय झालं? पण दोन ते तीन दिवसांत पुन्हा नवीन कोंब येतात, अंकुर येतात आणि मी बघितलंय, आठ ते दहा दिवसांत ते बदामाचं झाड पुन्हा हिरवंगार झालं. गुलमोहरसुद्धा हिरवागार झाला. म्हणून ही सडलेली पानं असतात ती झडलीच पाहिजेत. जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत. त्यांना झडून जाऊ द्या!

शिवसेनेचं राजकारण हिंदुत्व मजबूत होण्यासाठीच…
ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं?… काहीच सोडलं नव्हतं. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिलं हीच शिवसेनेची ताकद आहे. आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोपं घडवण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी माझ्या तमाम शिवसैनिकांना, माताभगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, चला परत उठा. आता पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया. ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं.

म्हणजे आता सडलेली पानं झडून पडताहेत…
– होय, सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पानं सगळं झाडाकडून घेऊनही ती गळून पडताहेत. आणि हे बघा, झाड कसं उघडंबोडपं झालंय असं दाखवायचा ते प्रयत्न करताहेत. पण दुसऱया दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो.

झडलेली, सडलेली पानं केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे?
– नक्कीच आता सुरू झाली आहे. आता नवीन कोंब फुटायला लागले आहेत. शिवसेनेचं तरुण आणि युवांशी नातं शिवसेनेच्या जन्मापासूनच आहे. मात्र एक आहे, अजूनही मोठय़ा संख्येने ज्येष्ठ शिवसैनिक येऊन भेटताहेत. ज्यांनी बाळासाहेबांसोबत काम केलं आहे, ज्यांना आपण पहिल्या पिढीचे म्हणू. ज्यांनी शिवसेनेचा संघर्ष पाहिलाय. स्वतः संघर्ष केलाय. त्यांना शिवसेना म्हणजे काय ते नेमपं कळलेलं आहे. त्यांना शिवसेनेकडून काही मिळावं ही अपेक्षा नव्हती आणि आजही नाही. पण ते येऊन आशीर्वाद देताहेत. हेच आशीर्वाद शिवसेनेला बळ देतील.

तुम्ही मलबार हिलवरील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचा अर्थात ‘वर्षा’चा उल्लेख केला. मघाशी मी आपल्याला म्हटलं की, आपण खूप रिलॅक्स दिसताय. पण मला असं दिसतंय की मलबार हिलवरून आपण पुन्हा ‘मातोश्री’वर आल्यावर जास्त रिलॅक्स झालात…
– अर्थात! माझं घर आहे ‘मातोश्री.’ इथेच जास्त रिलॅक्स वाटणारच! मी तुम्हाला मुद्दाम माझे काही अनुभव सांगतो. जेव्हा माझी शस्त्रक्रिया झाली… खरं तर दोन शस्त्रक्रिया झाल्या. तो अनुभव माझा वेगळा आहे. फार विचित्र अनुभवातून मी गेलोय. त्या वेळेला जेव्हा ॲनेस्थेशियामधून मला जागवले…

मुख्यमंत्री असताना…
– हो! शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री होतो ना. ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर ॲनेस्थेशियातून बाहेर पडताना मला डॉक्टरांनी विचारले की, सर कुठे जायचं? ‘मातोश्री’ की ‘वर्षा’? मी पटकन म्हटलं- मातोश्री! तेव्हा मी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर, तुम्ही मला अॅनेस्थेशिया दिला तेव्हा गुंगीत जरी विचारलं असतं ना तरी मी ‘मातोश्री’ हेच उत्तर दिलं असतं.

मग तुमची इच्छा नियतीनेच पूर्ण केली म्हणायची का ‘मातोश्री’वर येण्याची?
– मुळातच माझी ‘वर्षा’वर जाण्याची इच्छा होती का? याचं उत्तर सर्वांना माहीत आहे. याचा अर्थ आता मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून वाईट बोलतोय असं मुळीच नाही. ते एक वैभव आहे. मुख्यमंत्रीपदाचा आणि ‘वर्षा’चा मी अजिबात अनादर करणार नाही. ती एक वेगळी वैभवशाली वास्तू आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे एक वैभवशाली पद आहे, जबाबदारीचं पद आहे. त्याचा पूर्ण आदर ठेवून सांगतो, मी कधीच वैयक्तिक अशी स्वप्ने बघितली नव्हती. त्यावेळी जे घडलं ते आजच्या लोकांना ज्यांना आपण विश्वासघातकी म्हणू, त्यांना ते पूर्ण माहितेय की कसा पाठीत वार केला गेला आणि कोणत्या परिस्थितीत महाविकास आघाडीला आपल्याला जन्म द्यावा लागला होता.

तुम्ही इस्पितळात असताना, शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना तुमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता.
– त्या विषयावर बोलू का? खूप वेदनादायी आहे तो प्रकार.

असं तुम्हीसुद्धा कुठे तरी सूतोवाच केले आहे…
– मला कुठेही त्या अनुभवातून सहानुभूती नकोच आहे. म्हणून खरं तर मी या विषयावर बोलणं टाळतो, पण तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया ही काय असते ते कोणत्याही डॉक्टरला विचारा. त्यात काय धोके असतात याची कल्पना मला होती. पण ती शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. माझी पहिली शस्त्रक्रिया झाली. या पहिल्या शस्त्रक्रियेतून मी चांगला होऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर पाच-सात दिवसांनी डॉक्टर मला म्हणाले, उद्धवजी, उद्या आपल्याला जिना चढायचा आहे. त्यामुळे मी त्या मानसिक तयारीत होतो की उद्या आपल्याला जिना चढायचाय. एक एक पाऊल पुढे जायचं… सकाळी जाग आल्यानंतर जरा आळस देण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात मानेत एक ‘क्रॅम्प’ आला आणि माझी मानेखालची सगळी हालचालच बंद झाली. श्वास घेताना मी पाहिलं तर माझं पोटही हलत नव्हतं. पूर्णपणे मी निश्चल झालो होतो. एक ‘ब्लड क्लॉट’ आला होता. सुदैवाने डॉक्टर वगैरे सगळे जागेवरच होते. ज्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात, त्या ‘गोल्डन अवर’मध्ये ऑपरेशन झालं म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे बसलो आहे. त्यावेळी माझे हातपाय हलत नव्हते, बोटं हलत नव्हती, सगळ्यात मोठं टेन्शन होतं की डास चावला, मुंगी चावली तर खाजवायचं कसं? हाही एक वेगळा विचित्र भाग होता. त्या काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार?… तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या आणि त्याही पक्षाच्या विरोधात.

शिवसेनेच्या बाबतीत हे विश्वासघाताचं राजकारण वारंवार का होतं?
– याचं कारण हेच की, हा पक्ष आम्ही ‘प्रोफेशनली’ चालवत नाही असेच मी म्हणेन. तुम्हीसुद्धा शिवसैनिक आहात. गेली अनेक वर्षे शिवसेना अनुभवत आहात. आपण पक्षाकडे एक परिवार म्हणून बघत आलोय. बाळासाहेबांनी आपल्याला तेच शिकवलंय. माँनी तेच शिकवलंय की, आपलं म्हटल्यानंतर आपलं. कदाचित राजकारणामधला गुन्हा किंवा चूक असेल ती आमच्याकडून वारंवार होते. ती म्हणजे एखाद्यावर विश्वास टाकला की आम्ही त्याच्यावर अंधविश्वास टाकतो. पूर्ण जबाबदारीने त्याला ताकद देणं असेल, शक्ती देणं असेल… आम्ही ते करतो, पण आता ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपने युती तोडली होती तेव्हा आपण काय सोडलं होतं?… काहीच सोडलं नव्हतं. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. तुम्हाला मधला एक कालखंड आठवत असेल, जेव्हा शिवसेना विरोधी पक्षात बसली होती तेव्हा अनेकांना असं वाटलं होतं की, शिवसेना आता संपेल. पण त्या वेळी शिवसेना एकाकी लढली आणि 63 आमदार निवडून आले. त्या काळात विरोधी पक्षाचीही जबाबदारी आपल्यावर आली होती, तेव्हा मी पद कुणाला दिलं होतं? भाजपने आता जे केलंय हे माझ्याशी बोलणी केल्याप्रमाणे तेव्हा केलं असतं तर सगळं काही सन्मानाने झालं असतं. देशभरात ‘पर्यटन’ करण्याची गरज भासली नसती… आणि असं मी ऐकलंय, असं मी वाचलंय, माझ्याकडे पक्की माहिती नाही, पण हजारो कोटी रुपये यावर खर्च केले गेले. विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च, त्यानंतर काही आणखी अतिरिक्त खर्च…


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here