मुंबई,दि.21: मुंबईमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. सभेच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दसरा मेळावा आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, पण बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतेय असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईवर सध्या गिधाडं फिरत आहेत, अमित शाह हे त्यापैकीच एक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असाही ठाम विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतात. ते मिंधे गटात गेले नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
विशेष म्हणजे मुंबईत आता गिधाडं फिरायला लागली आहेत. गिधाडांची लचके तोडणारी अवलाद फिरायला लागली आहेत. मुंबई भडकवायची आहे, मुंबई गिळायची आहे, तुम्ही गिळू देणार? लचके तोडू देणार? हे नवीन नाहीय. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत मोठे झालेलो शिवसैनिक आहोत. स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेकजण स्वराज्यावर चालून आले होते. त्या कुळातले आताचे शाह, अमित शाह देशाचे गृहमंत्री मुंबईत येवून गेले आणि काय बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहिती नाही इथे जमिनीतून ही फक्त गवताची पाती नाहीत तर तलवारीची पाती आहेत. तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आजसुद्धा ठणकावून सांगतोय.
एक गोष्ट लक्षात ठेवा, मी गिधाड हा शब्द मुद्दामनू वापरला. कारण आज मुंबईत निवडणूक आली म्हणून मुंबई दिसते. पण जेव्हा मुंबईवर संकट येतात तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? मुंबई ही तुमच्यासाठी स्क्वेअर फुटात विकण्यासारखी जमीन असेल पण आमच्यासाठी मातृभूमी आहे.
शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आजच्या मेळाव्याला आदित्य ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरे हे देखील उपस्थित होते. शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा मोठा उत्साह दिसून आला. राज्यातील सत्तांतरानंतर आणि शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर गटप्रमुखांचा हा पहिल्यांदाच मेळावा होत आहे.
मिंधे गट दिल्लीला मुजरा करायला गेलाय
आमच्यावर वंशवाद-घराण्यावर टीका होते. कुटुंबियांवर टीका होते. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. ज्या मुंबईवर तुमची वाकडी नजर पडली आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जनसंघ नव्हताच. त्या चळवळीत माझे आजोबा होते. चळवळीचं रण पेटला असताना निवडणुका आल्या आणि जनसंघाने एकी फोडली. हा इतिहास तुम्हाला माहिती हवा. त्यानंतर दुर्देवाने आपण त्यांच्यासोबत युती केली. २५ वर्षे आमच्या राजकीय आयुष्यातील युतीमध्ये सडली. ते मी आज पुन्हा बोलतोय. ही सगळी नालायक माणसं आपण जोपासली. मेहनत शिवसैनिकांनी घ्यायची आणि डोक्यावर हे राष्ट्रीय पक्ष बसणार. तुमचं कर्तृत्व काय होतं? करता-करता वरती पोहचलात काय आणि पोहचल्यानंतर आम्हाला लाथा मारायला आलात? आज मी तुमच्यासमोर आहे आणि आदित्य आहे. वंशवादावर टीका करणार असाल तर तुमचा वंश कोणता त्यावरच वाद आहे. कारण एवढे उपरे घेतले आहेत ते घेतल्यानंतर तुमचा बावनकुळे की एकसे बावनकुळे हेच कळत नाहीय. कशाला नको तिकडे बोलत आहात. माझं म्हणणं काय मुद्द्याचं बोला, कामाचं बोला.
आज शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेचे हिंदुत्व कळतंय, मराठी – हिंदू सोबत उत्तर भारतीय, गुजराती सर्व आमच्या सोबत आहेत. तुमचे चेले-चपाटे इकडे जे बसले आहेत त्यांना सांगा मुंबई महापालिका निवडणूक एक महिन्यात घेऊन दाखवा आणि त्यासोबतच विधानसभेची देखील निवडणूक लावून दाखवा, असे थेट आवाहन उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मी अमित शाह ना आवाहन देतोय, तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाही तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत. कुस्ती आम्हांलाही येते, तीच आमची परंपरा आहे. पाहू कोण कुणाच्या पाठीला माती लावतो.