शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का?

0

मुंबई,दि.18: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार गेले आहेत. अनेक नगरसेवकही शिंदे गटात सामिल होत आहेत. शिवसेनेचे पदाधिकारीही एकनाथ शिंदे गटात सामिल होत आहेत. एकनाथ शिंदे हे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आता स्वत: ची कार्यकारणी तयार करणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या 14 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांची बैठक आज ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडत आहे. या आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या 19 पैकी 14 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू होती. शिवसेना खासदारांमध्ये झालेली फूट म्हणजे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाणार आहेत.

शिवसेनेत बंडखोरी सुरू झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिंदे गटात असलेल्या आमदारांना, त्यांच्या जवळील पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. काहींची हकालपट्टीदेखील करण्यात आली होती. कारवाईच्या या पार्श्वभूमीवर आमदारांच्या बैठकीत काही आमदार प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटातील ज्या पदाधिकाऱ्यांची ज्या पदांवरून हकालपट्टी झाली होती, त्यांना त्याच पदावर नियुक्त करण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here