मुंबई,दि.९: महापालिका निवडणूकीपूर्वीच माजी मुख्यमंत्री शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अनेकजण पक्षांतर करत आहेत. सध्या भाजपात प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.
राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच माहापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. महाराष्ट्रातील महापालिका निवडणूकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना जबरदस्त झटका बसणार आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचा ठाण्यातील बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे ठाण्यात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना मोठा नेता भाजपात प्रवेश करणार आहे.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि केडीएमसीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. डोंबिवली जिमखाना येथे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक आणि माजी केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थिती दीपेश म्हात्रे यांचा भजापमध्ये प्रवेश होणार आहे. दीपेश म्हात्रे, त्यांचे भाऊ जयेश म्हात्रे सह पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दीपेश म्हात्रे हे सर्वात पहिले शिवसेनेत होते, नंतर शिंदे गट आणि मग ठाकरे गटात केले.
शिवसेना शिंदे गटाला सोलापूर येथे मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे माजी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. येत्या १२ नोव्हेंबरला मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल. शिवाजी सावंत हे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. शिवाजी सावंत यांच्यासोबत शिंदेसेनेचे अनेक पदाधिकारी भाजपात प्रवेश करतील असा दावा शिवाजी सावंत यांनी केला आहे.








