मुंबई,दि.27: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टने प्रवास केला. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले होते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एकाच लिफ्टने प्रवास केला. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असेल.
कालच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापल्या पत्रकारपरिषदांमध्ये परस्परांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटूता पाहायला मिळेल, असा अंदाज होता. मात्र, आज सकाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी एक वेगळेच पण सुखद चित्र पाहायला मिळाले. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. ते विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आले होते.
निकाला अगोदरच अभिनंदन
अंबादास दानवे यांना चंद्रकांत पाटील यांनी चॅाकलेट दिले. तर दानवे पेढ्याचा बॅाक्स पुढे करत म्हणाले, ‘दादा लोकसभा निवडणुकीत आमचे 31 खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत.’ यावर चंद्रकांत पाटील यांनी पेढ्याचा एक तुकडा शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना देत म्हटले की, मी यांचा पेढा अॅडव्हान्समध्ये वाटतो. अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे होते. याचा निकाल 1 जुलैला जाहीर होईल. निकाला अगोदरच अभिनंदन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावेळी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे आणि अनिल परब हेदेखील उपस्थित होते.
एकाच लिफ्टने प्रवास
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले होते. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे लिफ्टने जाण्यासाठी आले असता, देवेंद्र फडणवीसही तिथे उभे होते. यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस लिफ्टसमोर गप्पा मारल्या. यानंतर त्यांनी तळमजला ते तिसऱ्या माळ्यापर्यंत एकत्र प्रवास केला.
उद्धव ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी भेटीबद्दल विचारलं असता त्यांनी लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी विचार करावा असं सूचक विधान केलं. तसंच डोळा मारला का? असं विचारलं असता उद्यापासून गॉगल घालतो असं उपहासात्मकपणे म्हटलं.
प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राजकारणात आपण राजकीय शत्रू असू, पण सदासर्वकाळ शत्रू नसतो. लिफ्टमध्ये मी शिरत असताना देवेंद्र आणि उद्धवजी आले, मिलिंद नार्वेकरही सोबत होते. आम्ही विधानपरिषदेच्या सभागृहाकडे चाललो होते. लिफ्ट सुरु झाल्यानंतर कोणीतरी बोललं, ‘आपण दोघं एकत्र आहात, बरं वाटतं’. त्यावर उद्धवजी ठाकरे यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीसांना म्हणाले, ‘याला पहिले बाहेर काढा’. तेव्हा मी बोललो की, ‘तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन. माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र? बोलता तसं करा’. त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला. उद्धवजी बोलतात तसं नाहीये, त्यांच्या पोटात एक ओठात एक, आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातील उत्तर मिळालं.