पुणे,दि.12: खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. भाजपा खासदार उदयराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी शिवसेनेतील बंडखोरी आणि शिवसेना कुणाची यावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे. शिवसेनेत बंड झालाय का? असा खोचक सवाल उदयनराजेंनी केला. तसेच “शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे” असा प्रश्न उदयनराजेंनी केला. ते शुक्रवारी (12 ऑगस्ट) पुण्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, “शिवसेनेत बंड झाला याबाबत मला काही माहिती नाही. बंड झालाय का? शिवसेना आहेच. शिवसेना कुणाची आहे यावरून वाद सुरू आहे.शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे. अरे वा, मग शिवसेना माझीच म्हटली पाहिजे. महाराष्ट्र माझाच म्हटला पाहिजे. काही नाही म्हणायचं.”
“लोकशाहीत संपूर्ण महाराष्ट्र हा लोकांचा आहे. लोकांच्या माध्यमातून कुठल्याही पक्षातील आमच्यासारखे लोकप्रतिनिधी मग ते आमदार असो वा खासदार निवडून जातात. त्यामुळे हा छत्रपतींचा महाराष्ट्र लोकांचा महाराष्ट्र आहे,” असं उदयनराजे भोसलेंनी म्हटलं.
“इतर राजांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये इतकाच फरक होता की ते स्वतःला राजा म्हणायचे नाही. मात्र, जनतेचा राजा म्हणून ओळख केवळ शिवाजी महाराजांची आहे,” असंही उदयनराजेंनी नमूद केलं.