Udaipur Kanhaiya Lal Murder:
राजस्थानमधील उदयपूरमध्ये (Udaipur) नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची तलवारीने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी सपासप वार करून त्याचा गळा चिरला.
राजस्थानच्या उदयपूरमध्ये भरदिवसा एका तरुणाची हत्या झाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना राजसमंद जिल्ह्यातील भीमा परिसरातून अटक केली आहे. मात्र हिंदू संघटनांची निदर्शने ठिकठिकाणी सुरू आहेत. निषेध म्हणून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
पोलिसांनी खबरदारी घेत पुढील 24 तास इंटरनेट सेवा बंद केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कन्हैयालाल तेली (40) यांचे धनमंडी येथील भूतमहालजवळ सुप्रीम टेलर्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दोन हल्लेखोर आले. कापड मोजमापाच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. कन्हैयालालला काही समजेपर्यंत हल्लेखोरांनी त्यांच्यावर एकामागून एक तलवारीने हल्ला केला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रियाझ मोहम्मद असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो भीलवाडा येथील असिंद भागातील रहिवासी आहे. गोस मोहम्मद असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. तो उदयपूरच्या खांजीपीर भागातील रहिवासी आहे.
तरुणाच्या हत्येनंतर शहरातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ‘उदयपूरमध्ये तरुणाच्या जघन्य हत्येचा मी निषेध करतो. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार असून पोलीस गुन्ह्याच्या तळापर्यंत जाणार आहेत. मी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अशा जघन्य गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनेनंतर उदयपूरमधील धनमंडी, घंटाघर, हाथीपोल, अंबामाता, सूरजपोल, भूपालपुरा आणि सविना पोलीस स्टेशन परिसरात वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत येथे कर्फ्यू लागू राहील.