पुणे,दि.15: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. तुकोबारायांची शिळा ही भक्ती आणि आधाराचं केंद्र आहे. संत तुकाराम महाराज यांचे अभंग अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक आहेत. संतांच्या कार्यातून नित्य ऊर्जा मिळत राहते. शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला येणे मिळणे हे माझे भाग्य असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहूमध्ये शिळा लोकार्पण सोहळ्याच्य वेळी मांडल्या.
मात्र या कार्यक्रमानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली.
उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार मारुतीबुवा कुऱ्हेकर, संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आणि आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले या वेळी उपस्थित होते.
अजित पवार यांना भाषण न करू देण्यावरून वातावरण तापलं आहे. याबाबत स्टेजवर उपस्थित असलेले भाजपा अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत आता स्पष्टीकरण दिलं आहे.
तुषार भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधानांच्या वेळेच्या व्यस्ततेमुळे हे झालं असेल बाकी यामध्ये काही नाही. पण यामध्ये एक सांगितले पाहिजे की पंतप्रधानांच्या हे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचना केली की आपल्याला बोलायचे आहे का. त्यावेळी अजित पवारांनी नम्रपणे सांगितले की मला बोलायचे नाही. त्यामुळे हा वादाचा विषय न करता पंतप्रधान मोदींनी वारकऱ्यांशी जो संवाद साधला त्यावर चर्चा व्हायला हवी,” असे तुषार भोसले यांनी टीव्ही ९ सोबत बोलताना सांगितले.